जखमी असूनही ६२ वर्षांच्या जिगरबाज शेतकऱ्याची रानडुकराशी फाइट

बीड : दूध घालण्यासाठी चाललेल्या वृध्द शेतकऱ्याला रानडुक्करने चावा घेऊन जखमी केले. परत हल्ला करण्यासाठी अंगावर धावून आलेल्या जखमी जिगरबाज शेतकऱ्याने रानडुक्करला आपटून बचाव केला. सदरील घटना आज सकाळी मौजवाडी ( ता. बीड ) येथे घडली. जखमी शेतकऱ्यास बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
लक्ष्मण रामभाऊ ठोंबरे ( वय ६२ वर्ष ) रा. मौजवाडी ( ता. बीड ) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. ते आज मंगळवारी ( दि. १४ ) सकाळी ८ वाजता शेतातून दूध घेऊन जात होते. यावेळी अचानक रानडुकराने हल्ला करत चावा घेतला. यामध्ये ठोंबरे जखमी झाले. चावा घेऊन पुन्हा परत हल्ला करण्यासाठी रानडुकराने त्यांच्याकडे झेप घेतली. परंतु जखमी असूनही प्रसंगावधान राखून रानडुकराला उचलून आदळले. त्यांची ही फाइट पाहून शेजारी अशोक जाधव, प्रभाकर ठोंबरे, सुरज जाधव, भीमा जाधव यांनी धाव घेऊन मदत केली. या सर्वांनी मिळून रानडुकराला पिटाळून लावलं. चावा घेतल्याने जखमी झालेले लक्ष्मण ठोंबरे यांना आधार दिला व उपचारासाठी बीड येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. ६२ वर्ष वय असतानाही जिगरबाज ठोंबरे यांनी या ताकदीने भरभक्कम असलेल्या प्राण्याशी दोन हात करुन त्यास माती चारून स्वतः चे रक्षण केले. त्यामुळे त्यांच्या या फायटींगची चर्चा सुरू आहे. या भागात मोठ्या प्रमाणात रानडुकरांची संख्या वाढल्याने वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.