चोरीच्या १८ दुचाकीसह दोघे जेरबंद; गेवराई पोलीसांची कामगिरी

गेवराई : तालुक्यासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यामुळे दुचाकी चोर सध्या बीड पोलीसांच्या रडारवर आहेत. गेवराई पोलीसांनी काल गुरुवारी ( २४ ) चोरीच्या १५ लाख ७५ हजार किंमतीच्या तब्बल १८ दुचाकी जप्त केल्या असून, भिवंडी, मुंबई व गेवराई मधून दोन संशयित आरोपी ताब्यात घेतले आहेत.
वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना पहाता पोलीस सतर्क झाले असून, या प्रकरणी दाखल गुन्ह्यांचा तपास करीत असताना गेवराई डी.बी. पथकाला गुप्त खबर मिळाली असता सापळा रचून मुंबईच्या भिवंडी येथून अन्सारी मोहम्मद शफी तर शेख मोबीन गेवराई असे दोघांना जेरबंद केले. चौकशी केली असता १८ दुचाकी विविध कंपनीच्या चोरीच्या असल्याचे उघडकीस आले. त्या सर्व दुचाकी पोलीसांनी ताब्यात घेतल्या आहेत. सदरील कामगिरी प्रभारी पोलीस अधीक्षक, उपाधीक्षक गेवराई, पोलीस निरीक्षक, गेवराई यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय साबळे प्रफुल्ल ( डिबी पथक प्रमुख), देशमुख विठ्ठल, एकनाथ कावळे, कृष्णा जायभाये, दत्ता चव्हाण यांनी केली. यामुळे काहींच्या चोरी गेलेल्या दुचाकी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.