चोरट्यांचे बीड पोलीसांना आव्हान; पोलीसाचेच घर फोडून सव्वा लाखाचा ऐवज लंपास

अंबाजोगाई : येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेले एपीआय रविंद्र शिंदे यांचे अज्ञात चोरट्यांनी घर फोडून कपाटातील दागिने किंमत १ लाख २६ हजार ८०० रू. चा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. पोलीसाच्या घरीच चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असता चोरट्यांनी बीड पोलीसांना आव्हान दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. पोलीस प्रशासन हे आव्हान कसे पेलनार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
एपीआय रविंद्र शिंदे हे अंबाजोगाई शहरातील पोखरी रस्त्यावरील सारडा नगरीत रहातात. ते ( दि. ४ ) मार्च रोजी कुटुंबासह बीड येथे गेले होते. घरी कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजाचा कडी,कोंडा तोडून घरातील कपाटातील झुंबर, नेकलेस, गंठन आदी सोन्याचे दागिने किंमत १ लाख २६ हजार ८०० रु. ऐवज चोरुन नेला. शिंदे घरी आल्यानंतर ( दि. ७ ) ही घटना उघडकीस आली. याबाबतीत एपीआय रविंद्र शिंदे यांच्या पत्नी कोमल यांनी चोरीची फिर्याद दिली. त्यावरुन अंबाजोगाई शहर ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसाच्या घरीच चोरट्यांनी हात साफ केल्याने एकच खळबळ माजली आहे. यापुर्वीच्या सराफा व बँक समोर पळविलेली रोकड असलेली बॅगचा अद्याप तपास लागलेला नाही. तोपर्यंत चक्क एपीआय असलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे घर फोडल्याने पोलीसांपेक्षा चोरटे एक काकन पुढे असल्याची चर्चा करण्यात येत असून एका प्रकारे हे बीड पोलीस दलाला आव्हान असून याचा तपास लावून चोरट्यांचे बंदोबस्त करणार का? असा सवाल जनतेतून विचारला जातो आहे.