चिऊताई चिऊताई अंगणी ये
हे पत्र सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या व्हाट्सअप ग्रुप वरुन घेतलं आहे. पत्र लिहणाऱ्यांचे नाव,फोन नंबर खाली आहे.

प्रिय चिऊताई ,
माझं पत्र पाहून तुला आश्चर्य वाटलं असेल नाही का ? तसं तुला पत्र लिहायचंच होतं पण वेळच साधत नव्हती.काही महिन्यापूर्वी तू आमच्या घरात घर केलं होतंस ,तेव्हाच माझ्या मनातही घर केलं होतंस.आज जागतिक चिमणी दिन म्हणजे तुझाच दिवस म्हटलं चला चिमणी दिनानिमित्त तुझ्याशी काहीतरी बोलावं ,म्हणून हा पत्र प्रपंच .
आमच्या मानवात लोकोत्तर महान व्यक्तींच्या जयंती पूण्यतिथी तसेच काही विशेष दिन साजरे केले जातात.असाच एक खास दिवस म्हणजे चिमणी दिवस ,तो आम्ही तुझ्यासाठी राखून ठेवला आहे.आता तुला प्रश्न पडला असेल ,हे सगळं कशासाठी ? पण ऐक ,दिन विशेष जरी तुझा असला तरी तो आमच्या मानव जातीसाठी आहे.आम्ही आजच्या दिवशी चिमणी संवर्धनाची हाक देतो.अरे यार सॉरी ,तुला संवर्धन शब्दाचा अर्थ कळला नसेल.सांगतो सांगतो ,सगळं सांगतो.आज सविस्तर बोलतोय ,काही कळजी करू नकोस.निसर्गामध्ये आमच्या आधी तुम्ही ,तुमच्यासारखे अनेक पक्षी प्राणी आलेले आहेत.आम्हा मानवांच्या हव्यासी प्रमादामुळे नैसर्गिक अधिवासावर घाला घातला गेला आहे.त्यामुळे अनेक छोट्यामोठ्या पशूपक्षांचे जीवन धोक्यात आलं आहे.सृष्टीतलं तुम्हा सर्वांचं महत्व लक्षात घेता आता आम्हाला उपरती झाली आहे.म्हणून आहे ते पशूपक्षी वाचविणं ,त्यांची संख्या वाढविण्यासाठी पोषक वातावरण तयार करणं या कार्यक्रमाला आम्ही संवर्धन म्हणतो.
प्रिय चिऊताई ,अगं तुला सांगतो माणुस व चिमणी हे नातं फार फार पुरातन काळापासून चालत आलेलं.आमच्याकडे बाळाच्या पाळण्याला कापडाच्या चिमण्या बांधतात ,पाळणा हलला की हललेल्या चिमण्या पाहणं बाळासाठी खूप मौजेचं.आई ,बाबा ,भाऊ बहीण या आमच्यातल्या ओळखीच्या नात्यानंतर थेट ओळख होणारा पक्षी म्हणजे तूच गं चिऊताई .चिवचिव करत थवेच्या थवे अंगणी बसत.अंगणात वाळवत घातलेलं धान्य ,धान्यासोबत छोटेछोटे कीडे मुंग्या ,आळ्या हे तुझं आवडतं खाद्य.ते तेव्हा मुबलक होतं म्हणून तुमची संख्याही खूप असायची.लहान लेकराला घास भरवताना चिऊचा घास ,काऊचा घास असं ऐकल्याशिवाय घासच गळ्यात उतरत नाही.पहिल्या घासापासूनच तू आमच्या ओळखीची.
आमच्या भारत देशात पशू जगतात तुझी संख्या सर्वात जास्त आहे.तुझं मूळ स्थान आमच्या आशिया खंडातलं पण नंतर तू संपूर्ण जग व्यापलंस.युरोप ,अमेरिकेचे दोन्ही खंड ,आफ्रिका ,ऑस्ट्रेलिया अशा संपूर्ण भूभागावर तुझा वावर आहे.तुझ्या नराच्या कपाळाचा ,शेपटीचा राखाडी रंग ,छातीवरचा भला मोठा काळा डाग ,पांढरंशुभ्र पोट ,पाठीवरच्या तपकिरी तुटक तुटक रेषा खरंच छान दिसतात.तुझा तपकिरी रंग तर लय भारी.अजून एक गंमत सांगू का ? तुमच्या चिमणी वर्गाला एक एक पाऊल मागंपुढं असं आमच्यासारखं चालता येत नसल्यामुळं तुम्हाला दोन्ही पायं एकाचवेळी उचलून टुणुक टुणुक उडी मारत चालावं लागतं.या तुमच्या उड्यांमुळे हालचालीतली लयबद्धता लय भारी दिसते बघ.गवत ,काडी ,कापूस ,दोरीचे धागे असं मिळेल ते उचलून काडी काडी जमा करून तुम्ही बांधलेलं सुबक घरटं मला खूप आवडतं.बरं अजून एक विशेष म्हणजे घर बांधताना तुझं आमच्या माणसासारखं कॉर्नरचाच प्लॉट पाहिजे ,मोठा रस्ताच पाहिजे असलं काही नसतं.तुम्हाला फोटोमागची ,भिंतीतल्या फटीची ,दिव्याजवळची अशी कुठलीही वळचणीची जागा चालते.झाडावरही तुझं घरटं असतं पण माणसाच्या घरात ,घर बांधणारी पक्षी जगातली तू एकटीच.बाकी दुसरा कोणताही पक्षी असं आमच्या घरात घर बांधत नाही.एवढ्या जवळून उडतेस पण कधी कुणाच्या हाती लागल्याचं ऐकण्यात नाही.तुम्ही दोघे नरमादी दोघे मिळून घर बांधता ,जबाबदारीने बाळांचे संगोपन करता ,या गुणासाठी तुम्हाला मानलंच पाहिजे.फिकट हिरव्या रंगाच्या अंडीतून बाहेर आलेली कोवळी कोवळी पिले मी खूप वेळी पाहिली आहेत.पिल्यांना तुम्ही दोघेही भरवता ,त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत थांबता.खरंच हे कौतुकास्पद आहे.आमच्याकडे तर सगळ्या मुलखाचा हुशार म्हणणारा माणुस पण काही काही जण कुटुंब व्यवस्थाच नष्ट करायले निघालेत.बरं जाऊ दे ,चालायचंच.
आम्ही माणसं चिमणी हा शब्द अजून दोन तीन ठिकाणी वापरतो बरं.जुन्याकाळी घरात एक छोटासा दिवा असायचा त्यालाही चिमणीच म्हणतो.माझ्या आधीच्या पिढीतले व सोबतच्याही अनेकजनांनी चिमणीखाली अभ्यास केलेला आहे.मोठ्या-मोठ्या कारखान्यात धूर बाहेर पडण्यासाठी धुरांडे (बॉयलर)असतात ,त्यालाही चिमणीच म्हणतात.एक गोष्ट ऐकून तुला खरोखरीच खूप आनंद होईल ,ते म्हणजे आम्ही लेकीच्या जातीला चिमणी म्हणतो.माहेरवाशीण म्हणून आलेल्या नववधूच्या तोंडावर हात फिरवून तिला थोरल्या आया चिमणी गं माझी असं म्हटल्या की आमच्या चिऊचं मन भरून येतं.एखादी चिमणी दुःखात असली की चिमणी गं माझी म्हटलं की टपकन अश्रू ढाळते.असं नाही व्हायला पाहिजे पण आमच्या मनुष्य जातीची त-हाच न्यारी.
तुझ्यासाठी गौरवाची बातमी सांगतो आमच्या भारत देशातल्या दिल्ली राज्याने तुला राज्य पक्षी म्हणून घोषित केलेलं आहे.मराठी साहित्यातले एक सारस्वत कवी ग्रेस यांनी त्यांचे एक पुस्तकच अंगणातील चिमण्यांना अर्पण केलेले आहे.तुझ्यावर गाणे आहेत ,कविता आहेत.चिमणी पाखरं हा पिक्चरपण आहे.तुला वेळ मिळाला तर जरूर बघ.बरं नको बघूस नाहीतर.लेकराच्या ताटातुटीनं मन लई व्याकुळ होतं ,तुला असलं बघणं सहन नाही व्हायचं.
मुठभर धान्य अन् घोटभर पाण्यासाठी तुमचं अस्तित्व धोक्यात आलं आहे.हे आता आम्हाला समजलं आहे म्हणूनच आमच्या अंगणाची शोभा नष्ट होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण प्रामाणिकपणे कामाला लागलो आहोत.
तू अंगणी ये.येताना तुझ्या संपूर्ण समुहाला घेऊन ये.अंगणातले दाणे टिपून घे .तिथंच पाणी ठेवलंय ,घोटभर पिऊन घे.
चिऊताई तू आमच्या अंगणाची शोभा आहेस गं.जिथं आसशील तिथून लवकर अंगणी ये.माझ्या घरातील चिमण्याही तुझी वाट पाहत आहेत.
जागतिक चिमणी दिनाच्या तुला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा .
कचरु चांभारे
मुख्याध्यापक
जि.प.प्रा.शाळा मन्यारवाडी ता.जि.बीड 9421384434