लोकगर्जना न्यूज
पुणे : एका भामट्याने आई आजारी असून उपचारासाठी पैसे हवेत अशी थाप मारुन एक -दोन नव्हे तर चक्क चार महिला आमदारांची फसवणूक केल्याची घटना राज्यात उघडकीस आली. फसवणूक झालेल्या चारही आमदार असल्याने याची जोरदार चर्चा सुरू आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात बिबवेवाडी ( पुणे ) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आमदार माधुरी मिसाळ यांना एक फोन आला. समोरील व्यक्तीने त्यांना आई आजारी असल्याचे सांगितले व उपचारासाठी पैशाची गरज दाखवली त्यांनाही हे खरे वाटले. कसलाही विलंब न करता मिसाळ यांनी गुगल पे वरुन आलेल्या फोन नंबर वरती ४ हजार ३०० रु. पाठवले. तसेच आमदार मेघना बोर्डीकर, आमदार श्वेता महाले, आमदार देवयानी फरांदे यांचीही फसवणूक झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये भामट्याने ऑनलाईन पद्धतीने पैश्याची मागणी केली. हा फसवणूकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच याप्रकरणी एका आमदारांनी तक्रार दिली. त्यावरून पुणे येथील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस त्या भामट्याचा व फोन नंबरचा शोध घेत आहेत. राज्यात एकाच वेळी चार महिला आमदारांची फसवणूक होणें धक्कादायक घटना असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तसेच अशा कोणत्या ना कोणत्या प्रकारे लोकांना फसवून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात आहेत. त्यामुळे याबाबत त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.