चहाचा कपही न पिता मतदारांनी तरुणाला केले सरपंच…. बीड जिल्ह्यातील ‘या’ गावाने धन शक्ती पेक्षा जनशक्ती मोठी ठरवली
लोकगर्जनान्यूज
केज : निवडणूकीला पैसा लागतोचं हा समज कळमआंबा ( ता. केज ) येथील मतदार व नवनिर्वाचित सरपंचाने खोटा ठरवला आहे. कपभर चहा न पाजताही मतदारांनी अपक्ष उमेदवार असलेल्या तरुणाला भरघोस मतदान करुन गावचा प्रथम नागरिक म्हणून विजयी केले. याची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
निवडणूक म्हटले की, पैसा आवश्यकच आहे. असेच चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणूकांचा खर्च आता ४०-५० लाखांपर्यंत पोहचला असल्याचे चर्चेतून उघड होत आहे. दररोज मतदारांना चपटी,बोटी द्यावीचं लागते. एवढं सगळं करुनही मतदानाच्या आदल्या रात्री ‘नोट’ दर्शन गरजेचे आहे.बाहेरुन मतदार आणण्यासाठी पेशल वाहन , सोबत खर्च आलाच. यासाठी लहान गावातही लाखोंचा खर्च होतो. यानंतर प्रस्थापितांचे डावपेच, दडपशाही पण जेव्हा गाव एकत्र येतो तेव्हा कोणीही काहीही करु शकत नाही. हे कळमआंबा येथील मतदारांनी दाखवून दिले आहे. येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चार पॅनल आणि सरपंच पदासाठी चार अपक्ष उमेदवार अशी निवडणूक झाली. यामुळे जुन्या मातब्बरांचे पॅनल होते. या निवडणूकीत शशिकांत इंगळे या अपक्ष तरुणाने बाजी मारली. मतदारांना कपभर चहाही पाजला नाही. परंतु मागील काही वर्षांपासून गावासाठी निस्वार्थ भावनेने केलेल्या कामांची पावती म्हणून मतदारांनी विश्वास दाखवून सरपंच पदासाठी आठजण निवडणूक रिंगणात असताना १३८ इतक्या मतांनी विजयी केले. एक साधारण तरूण परंतु जनसामान्यांच्या कामांची शिदोरी अन् युवा शक्तीच्या जोरावर हा विजय मिळाल्याचे शशिकांत इंगळे म्हणाले.
गाव माझं अन् मी गावाचा – नवनिर्वाचित सरपंच शशिकांत इंगळे
माझ्या कडे काहीच पैसे नव्हते. परंतु वॉटर कप स्पर्धेत केलेलं काम, कोणी अडचणीत असेल तर त्याची मदत करणं, गावाच्या भल्यासाठी निस्वार्थ भावनेने केलेलं काम पाहून गावकऱ्यांनी सरपंच केले. त्यामुळे आता माझं कोणीही विरोधक नाही. सर्वांना सोबत घेऊन गावाच्या विकासाची प्रयत्न करणार. जे विश्वास माझ्यावर दाखवलं त्याला तडा जाऊ देणार नाही. गाव माझं अन् मी गावाचा या भावनेतून काम करून. गावाचा चेहरामोहरा बदलून मतदारांचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. हा अनुभव पहाता विश्वास बसत नसेल पण हे सत्य असून, चांगला उमेदवार असेल तर पैसा नाही तर कामच बोलत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे आजही मतदार पैसे अन् पार्टीला नव्हे तर कामाला महत्व देत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. यामुळे राजकारणात येणाऱ्या नव तरुणांना बळ देणारी ही घटना असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त केली जात आहे.
बाहेरून आलेल्या मतदारांनी १ रुपया घेतला नाही
गावातील बाहेर असलेल्या मतदारांना आणण्यासाठी खूप खर्च करावा लागला. परंतु मी फक्त एक फोन केला. त्या फोनवर मुंबई,पुणे सह आदि ठिकाणी रहाणाऱ्या गावकऱ्यांनी स्वखर्चाने येऊन मला मतदान केले. त्यांनी १ रुपयाही माझ्याकडून घेतला नाही. अशी माहिती शशिकांत इंगळे यांनी दिली.