घोषणांची अंमलबजावणी झाल्यास मराठवाडा सुजलाम सुफलाम होणार!
लोकगर्जनान्यूज
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याचे मागासलेपणा पुसून टाकण्यासाठी शासनाकडून अनेक योजनांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक सिंचनाला झुकते माप दिले. तब्बल ५९ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली. या घोषणांची अंमलबजावणी झाल्यास मराठवाडा सुजलाम सुफलाम होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठवाड्याचे मागासलेपणा पुसून टाकण्यासाठी अनेक विकासकामांचे निर्णय घेण्यात आले. या नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती देत योजनांची घोषणा केली. यावेळी तब्बल ५९ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. यामध्ये मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ३५ सिंचन प्रकल्पांसाठी तब्बल ४५ हजार कोटींची घोषणा करण्यात आली. यामुळे मराठवाड्यातील जवळपास ८ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याचा दावा करण्यात आला. तसेच पशुसंवर्धन सार्वजनिक बांधकाम, परिवहन, ग्रामविकास, आरोग्य,शिक्षण, महसूल, नियोजन आदि विभागांसाठी मोठ्या निधी उपलब्धितेची घोषणा करण्यात आली. असा एकूण ५९ हजार कोटींचे पॅकेज आहे. घोषणा खूप होतात परंतु मराठवाड्याच्या पदरी काहीच पडत नाही. हा मराठवाड्यातील जनतेचा अनुभव आहे. त्यामुळे या घोषणा आणि निधी प्रत्येक्षात वापरला जाणार का? असा प्रश्न येथील जनतेचा आहे.