घोळ मिटता मिटेना! शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला पीक विमा रक्कम परत जाणार
बुधवार - दि. ०४-०१-२०२३

लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा रक्कम जमा झाली आहे. परंतु तांत्रिक चुकीने हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम गेल्याचा साक्षात्कार बजाज अलियान्झ कंपनीला झाला. या कंपनीच्या व्यवस्थापकांनी अग्रणी बँकेला पत्र पाठवून त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरील रक्कम पुन्हा बजाज कंपनीच्या खात्यावर वळविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली पीक विम्याची रक्कम आता परत जाणार असे चिन्ह दिसत आहे. पीक विम्याचा घोळ मिटता मिटेना अशी जिल्ह्याची अवस्था झाली आहे.
तक्रार करुनही अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही. त्यामुळे ते दररोज बँकेच्या मेसेजची वाट पाहत आहेत. मिळाला त्यांनाही कोणाला कमी तर कोणाला जास्त रक्कम आल्याने नेमके कोणत्या नियमानुसार विमा आला याचा ताळमेळ लागेना. तक्रार न केल्याने ८० टक्के शेतकरी पीक विम्याला मुकणार असे चित्र असून, यातच विमा कंपनीने दुसरेच कारण पुढे आणले आहे. तांत्रिक चुकीमुळे १२ हजार ८८३ शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप २०२२ चा पीक विमा जमा झाल्याचा दावा केला. तब्बल १२ लाख ३५ हजार रुपये बजाज अलियान्झ कंपनीच्या खात्यावर जमा करण्याची मागणी राज्याचे व्यवस्थापक अजिंक्य खिर्डीकर यांनी अग्रणी बँक बीड येथे पत्र पाठवून केली. या सोबत दावा केल्या प्रमाणे १२ हजार ८८३ शेतकऱ्यांच्या नावांची यादी दिली आहे. यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यावर पडलेली पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम परत जाणार असे चिन्ह दिसत आहेत. ही बाब समोर येताच शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून, विमा कंपनी शेतकऱ्यांना मानसिक त्रास देत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांचे सोशल मीडियावर ‘खात्यावरील’ रक्कम उचलण्याचे आवाहन
खरीप २०२२ पीक विमा नुकसान भरपाईची जमा झालेली रक्कम हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावरुन परत जाणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी जिल्ह्यात पोचली. यानंतर सोशल मीडियावर बँक खात्यावरील रक्कम काढून घ्या, तुमचे खाते होल्ड होऊ शकते अथवा रक्कम वर्ग होऊ शकते. या आशयाच्या पोस्ट दिसून येत आहेत.