घाटनांदूर येथील मेंढपाळास शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी – ॲड. माधव जाधव
घाटनांदूर : अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदुर येथे सोमवारी सकाळी अचानक १६ मेंढ्या मृत पावल्या. येथील मेंढपाळ शंकर दगडू वैद्य हे आपल्या मेंढ्या चारण्यासाठी शेताकडे नेत असताना गावाच्या बाहेरील गायरनात अज्ञाताने विकृत मानसिकतेतून विषारी पदार्थ मिसळून अन्नपदार्थ व भाकरीचे पसरवून टाकले होते. हे अन्नपदार्थ व भाकरीचे तुकडे मेंढ्यांनी खाल्ल्याने विषबाधा झाली. अवघ्या तासाभरात मेंढ्या तडफडू लागल्या; एक एक मेंढी तडफडून प्राण सोडून देत होती. माणसाच्या विकृत मानसिकतेमुळे मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला. एकूण १६ मेंढ्या मृत पावल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी एल गायकवाड, डॉ. सुदर्शन मुंडे डॉ. बोने, डॉ. जावळे व नेमाने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि वेळीच उपचार केल्याने उर्वरित मेंढ्यांना वाचवण्यात त्यांना यश आले आहे.
अचानक सोळा मेंढ्या मृत पावल्याने मेंढपाळ शंकर दगडू वैद्य यांचे जवळपास अडीच तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे पीडित मेंढपाळ मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून त्यांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. किसान काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष ॲड. माधव जाधव यांनी येथील तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे.