ग्रामीण पत्रकारितेचे आव्हान आसरडोहकरांनी स्वीकारले – श्यामसुंदर सोन्नर महाराज
बाबा देशमाने यांना त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठानचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान
अंबाजोगाई – ग्रामीण भागात पत्रकारिता करणे अवघड होते. मात्र हे अडथळे झुगारून कै. त्र्यंबक आसरडोहकरांनी ग्रामीण भागातील पत्रकारितेचे आव्हान स्वीकारले होते. ,असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार शामसुंदर सोन्नर यांनी रविवारी (दि.२२) येथे केले.
येथील (कै) त्र्यंबक आसरडोहकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा यंदाचा “उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार” बाबा देशमाने यांना प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी सोन्नर महाराज बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा किसानपूत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब हे होते. स्वाराती मधील मेडीसीन विभाग प्रमुख डाॅ. सिध्देश्वर बिराजदार, सत्कारमुर्ती बाबा देशमाने,
रेखा आसरडोहकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकऱ्यांच्या बायकांची वेदना शहरी भागातील पत्रकारांनी जाणून घेणे गरजेचे आहे. त्या टेबलावर बसून समजणार नाहीत, अशी खंतही सोन्नर यांनी व्यक्त केली. अमर हबीब म्हणाले, की आसरडोहकर यांनी सुरू केलेल्या, जागल या अंकाचे मी पत्रकारिताचे धडे गिरवले आहेत, असे सांगून त्यांनी हातची नोकरी सोडून पत्रकारितेसाठी ध्येय वेडे झाले होते. त्याकाळी मराठवाडयतील ग्रामीण लेखन फक्त आसरडोहकर यांनी केले. त्यांना सुक्ष्म दृष्टी होती आणि इतरांशी पंगा घेण्याची त्यांची हिंमत होती, त्यांचे व्यक्तिमत्त्व जिंदा दिल होते. सन्मानमूर्ती बाबा देशमाने यांनी गोव्यात पत्रकारिता केली, हे बीड जिल्ह्यासाठी भूषणावह आहे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनीही मनोगत व्यक्त केले. आरोग्यदूतची सकारात्मक पत्रकारिता समाजासाठी उपयोगी आहे. त्याची धुरा बाबा देशमाने समर्थपणे चालवत आहेत, असे बिराजदार यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा. रोहीनी देशमुख यांनी केले. सुत्रसंचलन गोविंद केंद्रे यांनी केले. पत्रकार किरण आसरडोहकर यांनी आभार मानले. यावेळी कार्यक्रमास प्रसिद्ध पखवाज वादक उध्दव आपेगावकर, माधव बागवे, डॉ. सुरेश अरसुडे, प्रा. गोरख शेंद्रे, दीपक सांगळे, रमेश तिडके, विद्याधर पांडे, विराट गुरूजी, प्रा. बरूरे, प्रा. अलका तडकरकर, सुनिता यात्रेला, सुरेखा सिरसट, उदय आसरडोहकर, सुदर्शन रापतवार, दत्ता अंबेकर, संजीवनी देशमुख , सुधाकर तट आदींची उपस्थिती होती.
अंबाजोगाईकरांनी दिलेला पुरस्कार
प्रेरणा देणारा: बाबा देशमाने
सन्मानमूर्ती बाबा देशमाने म्हणाले, की चोखंदळ असलेल्या अंबाजोगाईकरांनी दिलेला पुरस्कार मला सतत प्रेरणा देणारा आहे. माझ्यासाठी घरचा सन्मान मोलाचा वाटतो. आरोग्यदूतमधून मी अनेक आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.