ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्वीकारण्याचे आदेश:कोणतेच सर्व्हर नीट नसताना ऑनलाईनचा हट्ट का?

लोकगर्जनान्यूज
बीड : ग्रामपंचायत निवडणूक सदस्यांचे उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे आदेश होते. परंतु सर्व्हर चालत नसल्याने ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची मागणी विरोधीपक्ष नेते अजित पवार, माजीमंत्री धनंजय मुंडे यांनी केली होती. या मागणीला यश आले असून निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज ऑफलाईन स्वीकारण्याचे आदेश दिले. यामुळे इच्छुकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. कोणतेही सर्व्हर नीट चालत नसल्याने ऑनलाईनचा हट्ट का धरला जातोय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, बीड जिल्ह्यातील ७०४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. यासाठी २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ऑनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अट होती. परंतु सर्व्हर व्यवस्थित चालत नसल्याने रात्र जागून काढूनही अर्ज दाखल होत नव्हते. यामुळे ग्रामपंचायत निवडणुक लढवणाऱ्या इच्छुकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. आज व उद्याचा दिवस असल्याने उमेदवारी दाखल होणार की, नाही. अशी चिंता होती. यामुळे ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेण्याची मागणी करण्यात येत होती. याबाबत बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनीही निवडणुक आयोगाला विचारणा केली असता. निवडणुक आयोगाने ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे उमेदवार आता ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरु शकतात. या निर्णयाने इच्छुकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
ऑनलाईनचा हट्ट का?
पोलीस भरती अर्ज ऑनलाईन, पीक विमा भरणा, नुकसानीची तक्रार, ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज ऑनलाईन असे निर्णय घेण्यात येतात. परंतु नंतर सर्व्हर चालत नाहीत. यासाठी सामान्य जनतेला रात्र-रात्र जागून काढावी लागते. ओरड झाली की, मुदतवाढ अथवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचे आदेश येतात. यामुळे जनतेला त्रास काही परत येत नाही. आधीच हा ऑनलाईनचा हट्ट का केला जातो? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.