गेवराई तालुक्यातील पाचेगावात चोरट्यांचा धुमाकूळ:एका रात्रीत फोडली पाच दुकाने
लोकगर्जना न्यूज
गेवराई : तालुक्यातील पाचेगाव येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन मेडिकल, एक कृषी सेवा केंद्र आणि एक सराफा दुकान आफोडल्याचे आज गुरुवारी ( दि. ८ ) सकाळी उघडकीस आले. एकाच रात्री पाच दुकाने फोडल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच येथे पोलीस चौकी असूनही ती कधीतरी उघडते त्यामुळे चौकी केवळ शोभेची वस्तू ठरत आहे.
पाचेगाव येथील बसस्थानक परिसरातील ज्ञानराज व देवा हे दोन मेडिकल तसेच येथून जाणाऱ्या राज्य रस्ता २३२ वरील फुलझळके मेडिकल आणि बोरगाव रस्त्यावर असलेले बाबुराव गाडे यांचे माऊली ॲग्रो एजन्सी तर शुभम ज्वेलर्स या पाच दुकानांचे शटर उचकटून फोडण्यात आली. या सर्व ठिकाणावरून चोरट्यांनी रोख रक्कम तर शुभम ज्वेलर्स मधून चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पंचनामे झाल्यानंतर नेमकी रक्कम व आणखी काय? चोरीला गेले ही अधिकृत माहिती मिळेल. सीसीटीव्ही मध्ये येऊ नये म्हणून चोरट्यांनी कॅमेरे फोडून नुकसान केले आहे. तर येथे २०१५ पासून पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने चौकीसाठी दोन गाळे ही दिले आहेत. परंतु येथे पोलीस रहात नसल्याने चौकी शोभेची वस्तू ठरत आहे.