गावच्या समस्यांसाठी तरुण चढला टॉवरवर; बीड जिल्हा प्रशासनाची धावपळ
लोकगर्जनान्यूज
बीड : गावातील वस्तीच्या रस्त्यांची मागील आठ वर्षांपासून दुरावस्था झाली. यामुळे ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांना त्रास होत असल्याने रस्ता करण्यात यावं यांसह विविध मागण्यांसाठी आष्टी तालुक्यातील तरुणाने चक्क टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले. या प्रकारामुळे बीड जिल्हा प्रशासनाची धांदल उडाली असून, जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही. असा पवित्रा तरुणाने घेतला आहे. घटनास्थळी शिवाजी नगर पोलीस दाखल झाले आहेत.
आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील तरुण अशोक शिवाजी माने याने प्रशासनाला झांजे वस्ती, तरटे वस्ती व धानोरा ते वाहिरा या रस्त्यांची मागील आठ वर्षांपासून दुरावस्था झाली आहे. यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागतो आहे. तसेच रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शालेय विद्यार्थ्यांचा अपघात होऊन दुखापत झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांना मंजुरी देऊन सिमेंट कॉंक्रेटचे रस्ते करण्यात यावे, येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध करून द्यावे या मागणीचे प्रशासनाला निवेदन दिले. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने तरुणाने चक्क बीड शहर गाठून नगर रोडवरील बालेपीर भागातील एका मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले. सकाळीच तो तरुण टॉवरवर चडल्याची माहिती मिळताच प्रशासनाची धांदल उडाली. घटनास्थळी शिवाजी नगर पोलीस दाखल झाले आहेत. आंदोलक तरुणाने जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही. असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे प्रशासन यावर कसा तोडगा काढणार याकडे पुर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.