खळबळ! बीड जिल्ह्यातील तरुणाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न; सहाव्या मजल्यावरून मारली उडी
लोकगर्जनान्यूज
बीड : आज दुपारच्या सुमारास मंत्रालयात एक थरारक घटना घडली आहे. एका तरुणाने चक्क मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना समजताच परिसरात खळबळ माजली. संरक्षण जाळी मुळे तरूणाचे प्राण वाचले असून, त्यास दवाखान्यात दाखल करण्यात आले. हा तरुण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील असल्याचे सांगितले जात आहे.
बापू नारायण मोकाशी असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे नाव असल्याचे वृत्त आहे. आज गुरुवारी ( दि. १७ ) मंत्रालयात मंत्रीमंडळाची बैठक सुरू असताना बापू मोकाशीने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने सहाव्या मजल्यावरून उडी मारली पण या इमारतीला संरक्षण जाळी बसवण्यात आलेली आहे. तो सरळ या जाळीत अडकला. ही घटना घडताच मंत्रालयात धावपळ उडाली. उपस्थित पोलीसांनी सदरील तरुणाला ताब्यात घेतले आहे. या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न का केला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.