खळबळजनक! धारदार शस्त्राने वार करुन महिलेचे दागिने लुटले; केज पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांना अच्छे दीन!
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील विडा येथून आठवडी बाजार करुन गावाकडे परत जात असलेल्या वृद्ध महिलेवर अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने वार करुन मारहाण करत अंगावरील दागिने व रोख रक्कम घेऊन पोबारा केला. या घटनेने केज तालुक्यात खळबळ उडाली असून शहरातील बसस्थानक परिसरात होणाऱ्या चोरी व लुटीच्या घटना आता ग्रामीण भागात पोचल्याने केज पोलीस ठाण्यात चोरट्यांना अच्छे दीन आल्याची चर्चा जनतेतून होऊ लागली आहे.
प्रत्येक शनिवारी विडा येथे आठवडी बाजार असतो. या बाजारासाठी परिसरातील अनेक वस्ती,वाडी तांड्यावरील लोक येतात. आठ दिवस पुरेल असे किराणा, भाजीपाला व लेकरांना खाऊ घेतात. ग्रामीण भागासाठी आठवडी बाजार हीच मोठी बाजारपेठ समजली जाते त्यामुळे कपडे व सोन्याचांदीचे दागिने सह आदी खरेदी करतात. शनिवारी ( दि. ३० ) कुशाबाई विश्वनाथ आंधळे रा. आंधळेवाडी या बाजारासाठी आलेल्या होत्या बाजार करुन सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गावाकडे परत जाताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने कुशाबाई यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यानंतर जबर मारहाण करुन गळ्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली. जखमी अवस्थेतील कुशाबाई विश्वनाथ आंधळे यांना काही नागरिकांनी उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. परंतु पाच वाजता ही घटना घडल्याने केज तालुक्यात खळबळ उडाली आहे. यापुर्वी फक्त दिवसा बसस्थानक परिसरात चोऱ्या होत असे परंतु स्थानिक पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे चोरट्यांचे मनोबल वाढले की,काय? यामुळे ते आता ग्रामीण भागात पोचून जिवघेणा हल्ला करत लोकांना लुटत असल्याची चर्चा नागरिक करत आहेत.