खळबळजनक! खंडणीसाठी मुलीचे अपहरण; पोलीसांनी अवघ्या 24 तासात लावला छडा
लोकगर्जनान्यूज
बीड : आष्टी शहरातील एका मुलीचे तीन लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची खळबळजनक घटना घडली. परंतु याबाबत आष्टी पोलीसांनी चित्रपटाला शोभेल या पद्धतीने तपास करत अवघ्या 24 तासात मुलीला सुखरूप ताब्यात घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. परंतु आष्टी सारख्या शहरापर्यंत हा अपहरण व खंडणी वसूल प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, आष्टी येथून एका आरोपीने तीन लाखांच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलीचे ( दि. 25 ) अपहरण केले. यानंतर सदरील आरोपीने मुलीच्या पालकाला फोन करुन तीन लाखांची खंडणी मागितली, या प्रकाराने घाबरलेल्या मुलीच्या वडीलांनी आष्टी पोलीसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यावरून अज्ञात आरोपीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने एक पथक यासाठी तयार करून तपास सुरू केला. सतत तो आरोपी तीन लाखांसाठी फोन करत होता. त्या आधारे आष्टी पोलीस व बीड सायबर पोलीस यांनी फोनच्या आधारे आरोपीचा ठिकाण शोधलं असता त्याच लोकेशन इंदापूर-भिगवन परिसरात आढळून आले. यावरुन सापळा रचून मोठ्या शिताफीने पोलीसांनी मुलीला सुखरूप ताब्यात घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईमुळे आष्टी पोलीसांचे कौतुक करण्यात येत आहे.