खळबळजनक! आईसह लेकरांची मृतदेह विहिरीत आढळली
लोकगर्जना न्यूज
घरा शेजारी असलेल्या विहिरीत आई व तीन लेकरांचे मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी ( दि. ४ ) अहमदनगर जिल्ह्यातील खांडगेदरा ( ता. संगमनेर ) गावात उघडकीस आली. या प्रकरणी ममतांच्या पित्याच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस अधिक तपास करत आहेत.
स्वाती बाळासाहेब ढोकरे ( वय २८ वर्ष ), शिवम बाळासाहेब ढोकरे ( वय ४ महिने ), दोन मुली भाग्यश्री (५ वर्ष ) आणि माधुरी बाळासाहेब ढोकरे ( वय ३ वर्ष ) असे मयत आई व लेकरांची नावं आहेत. बाळासाहेब गणपती ढोकरे हा पत्नी व तीन लेकरांसह रहात होते. शुक्रवारी ( दि. ४ ) दुपारी आई स्वाती, मुली भाग्यश्री, माधुरी, मुलगा शिवम असे चौघांचे ही मृतदेह घराजवळ असलेल्या विहिरीत आढळून आले. ही घटना गावात पसरताच पुर्ण गाव विहिरीच्या दिशेने पळत सुटले एकच गर्दी झाली. घटनेची पोलीसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर चार ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. शवविच्छेदनासाठी कुटीर रुग्णालय, संगमनेर येथे पाठविण्यात आले. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून, आत्महत्या की, घातपातचा प्रकार आहे अशी उलट सुलट चर्चा सुरू आहे. परंतु आई व लहान-लहान लेकरांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.