खड्डे बुजविणारे गुत्तेदार मालामाल; आडस-धारुर रस्त्याचे दारिद्रय कायम!
केज तालुक्यातील आडस ते धारुर हा या भागातील प्रमुख रस्ता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यावरील फक्त खड्डे बुजवण्यापुढे काही काम झाले नाही. त्यामुळे खड्डे बुजविणारे गुत्तेदार मालामाल झाले परंतु रस्त्याचे दारिद्रय कायम दिसतं आहे. दोन महिन्यांपूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. पुन्हा खड्डे पडायला सुरुवात झाली.
आडस येथून धारुरकडे जाणारा रस्ता राज्यमार्ग क्र. २३२ आहे. तसेच अंबाजोगाई, लातूर, हैदराबाद, औरंगाबाद, जालना यांना जोडणारा सर्वात कमी अंतराचा हा मार्ग आहे. इंधन व वेळ वाचवणारा जनतेच्या सोईचा मार्ग असल्याने यावर नेहमी वाहनांची गर्दी असते. परंतु लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांनी दुर्लक्षित केलेला मार्ग म्हणून याकडे पाहिले जात असून यास कारण ही तसेच आहे. गेली अनेक वर्ष झाली या रस्त्यावरील फक्त खड्डे बुजविण्यात येतात. तेही वर्षातून तीन ते चार वेळा. सतत खड्डे बुजविण्याचे काम मिळतं असल्याने गुत्तेदार मालामाल झाल्याचे सांगितले जात आहे. दोन महिन्यांपूर्वी आडस-धारुर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. पुन्हा यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली. काही खड्डे नवीन आहेत तर काही बुजलेली खड्डे दर्जाहीन कामामुळे उखडत आहेत. त्यामुळे पुन्हा या रस्त्याची दुरवस्था झाली. नेहमीच खड्डे असल्याने अनेक वाहन धारकांनी अंबाजोगाईला आडस मार्गे जाण्या ऐवजी केज मार्गे असा वळसा घालून जाणे पसंत करीत आहेत. यामुळे इंधन जास्त लागते तर वेळही परंतु वाहनधारक मणक्यांचे आजार होउ नये म्हणून ही झळ सोसत आहेत. या रस्त्याचे दारिद्रय संपणार की, नाही, का गुत्तेदार पोसण्यासाठी हा रस्ता राखीव ठेवण्यात आला? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
आडस-अंबाजोगाई प्रवास सुखाचा!
आडस-धारुर प्रमाणेच आडस-अंबाजोगाई रस्त्याची दुरवस्था होती. परंतु आमदार नमिता मुंदडा यांनी रस्ता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून घेतला. दरम्यानचे खड्डे बुजवून त्यावर कारपेट टाकले आहे. मध्येच एक ते दोन कि.मी.चे राहिलेले काम वगळता आडस ते अंबाजोगाई हा २० कि.मी. रस्ता सध्यातरी खड्डे मुक्त झाला असल्याचे प्रवास सुखाचा होतो आहे. परंतु या मार्गावरील आडस ते केंद्रेवाडी आश्रम शाळे पर्यंतचे काम व्यवस्थित न झाल्याने त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. ते तातडीने बुजविण्यात यावेत अशी मागणी करण्यात येत आहे.