क्षुल्लक कारणावरून जमावाचा हल्ला ग्रामपंचायत सदस्य ठार तर एक गंभीर
लोकगर्जना न्यूज
अंबाजोगाई : शहरालगत असलेल्या चनई येथे राशन वाटपावरून झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर जमावाने ग्रामपंचायत सदस्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी सोडविण्यासाठी आलेला व्यक्तीही जखमी झाला. दोघांनाही उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात दाखल केले. येथे उपचारादरम्यान ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू झाला. घटनेने चनईमध्ये तणावाचे वातावरण असून पाच संशयित हल्लेखोरांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
गोरखनाथ सीताराम घनघाव ( वय ५० वर्ष ) रा. चनई ( ता. अंबाजोगाई ) यांच्यावर दहा ते १२ जणांच्या जमावाने बुधवारी ( दि. ५ ) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. यावेळी त्यांना मारहाण करत धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. हे भांडणं पाहून सोडविण्यासाठी आलेल्या व्यक्तीही गंभीर जखमी झाला. दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याने त्यांना तातडीने स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे उपचारादरम्यान गोरखनाथ घनघाव यांचा मृत्यू झाला. सदरील घटना राशन वाटपावरून झालेल्या शाब्दिक चकमकीतून घडल्याचे सांगण्यात येत आहे. मयत गोरखनाथ घनघाव हे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आले आहेत. ऐन दसऱ्या दिवशीच घनघाव यांचा खून झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळा आहे. चनई येथे सध्या तणावाचे वातावरण असून पोलीस प्रशासन लक्ष ठेवून आहे. या प्रकरणी पाच संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.