कोळपणी करताना करंट लागून शेतकऱ्याचा मृत्यू तर बैलजोडी दगावली
धारुर तालुक्यातील संगम येथील दुर्दैवी घटना
लोकगर्जनान्यूज
किल्लेधारुर : तालुक्यातील संगम येथे शेतात कोळपणी करताना विद्युत पोलला दिलेल्या तानच्या तारेचा करंट लागून बैलजोडी जागीच ठार झाली तर जखमी शेतकऱ्यास उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले होते परंतु त्यांचाही मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी (दि.१) दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
बालासाहेब बाबासाहेब डापकर रा.संगम ( ता.धारुर) असे मयत शेतकऱ्याचे नाव असून, ते आज सोमवारी स्वतःच्या शेतात कोळपणी करत होते. यावेळी शेतातून गेलेल्या विद्युत पोलला तान दिलेल्या तारेत विद्युत प्रवाह उतरलेला होता. त्या तारेला कोळप्याचा स्पर्श होताचा करंट लागून कोळप्याला जुंपलेली १ लाख किंमतीची बैलजोडी जागीच दगावली तर शेतकरी बालासाहेब डापकर यांना करंट लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते. शेजाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांना तातडीने उपचारासाठी माजलगाव येथे दवाखान्यात नेण्यात आले. पण त्यांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेने धारुर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.