कोंबडीचे पाय तोडण्यावरुन सुरू झालेल्या भांडणाचा शेवट झाला डोकं फोडून;केज तालुक्यातील घटना

लोकगर्जनान्यूज
केज : दोन मित्र चिकन शॉपवर गेले. तिथे शॉप चालक नसल्याने कोंबडीचे पाय तोडण्यावरुन या दोघांमध्ये जुंपली यातील एकानं डोक्यात सत्तुर मारुन दुसऱ्याला जखमी केले असून कोंबडीचे पाय तोडण्यावरुन सुरू झालेल्या भांडणाचा शेवट डोके फोडून झाल्याची घटना तालुक्यातील साळेगाव येथे मंगळवारी ( दि. २७ ) दुपारी घडली आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, दिगंबर मारुती राऊत, अशोक सुरेश राऊत हे दोघे गावातील एका चिकन शॉपवर गेले. नेमकं यावेळी शॉप चालक नव्हते अशोक राऊत सत्तुर घेऊन कोंबडीचे पाय तोडू लागला. दुकानदार येऊदे तु काही करु नको असे म्हणून दिगंबर राऊतने कोंबडीचे पाय तोडायला अशोकला विरोध केला. यातून दोघां मित्रांमध्ये बाचाबाची सुरू झाली. ही गोष्ट गुद्यावर आली. काही कळण्याच्या आत अशोकने दिगंबरच्या डोक्यात सत्तुर मारुन डोकं फोडून जखमी केले. याप्रकरणी दिगंबर मारुती राऊत यांच्या फिर्यादीवरून अशोक सुरेश राऊतच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.