अंबाजोगाई : येथील कै. त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठानचा दरवर्षीप्रमाणे दिला जाणारा मानाचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार यंदा बाबा श्रीहरी देशमाने यांना जाहीर झाला आहे.
बाबा देशमाने हे मूळचे दिंदुड जवळच्या चाटगाव येथील राहणारे असून मुंबईहुन प्रकाशित होणाऱ्या ‘आरोग्यदुत’ चे संपादक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संस्थेच्या वतीने ‘आरोग्यदूत’ प्रकाशित केले जाते. बाबा देशमाने यांनी अनेक वर्तमानपत्रांत उपसंपादक पदावर कार्य केले आहे. बीड जिल्ह्यातील या तरुण पत्रकाराने गोव्यात जाऊन पत्रकारिता केली आहे.
त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा हा ११ वा पुरस्कार आहे. या पूर्वी सय्यद दाऊद, श्रावणकुमार जाधव, दत्ता देशमुख, बाळासाहेब गाठाळ, गोविंद शेळके, अतुल कुलकर्णी, संदीप सोनवळकर, विद्या गावंडे. कलीम अजीम, शुभम खाडे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम आणि स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ असे आहे. हा पुरस्कार 20 जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल, असे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा किरण आसरडोहकर यांनी सांगितले.