केज-मांजरसुंबा रस्त्यावर चालत्या वाहनावर चढून चोरी करणारे दोघे पोलीसांच्या ताब्यात

केज : केज-मांजरसुंबा महामार्गावर चालत्या वाहनावर चढून चोरी करणाऱ्या दोघां संशयितांना केज पोलीसांनी ताब्यात घेतले असून एक पळून जाण्यात यशस्वी झाला. या रस्त्यावरील चोरीच्या घटनांना आळा बसेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मागील अनेक दिवसां पासून केज तालुक्यातील शिंदी फाटा ते कोरेगाव दरम्यान चालत्या वाहनावर चढून धारदार शस्त्राने ताडपत्री फाडून विविध वस्तू चोरीच्या घटना घडत आहेत. याची दखल घेऊन
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशा वरून स्थानिक गुन्हे शाखा आणि केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्यासह जोगदंड, मंगेश भोले, अशोक नामदास, महादेव बहीरवाळ आणि दिलीप गित्ते यांचे पथक ( दि. १९ ) मंगळवारी पहाटे ५:०० वाजल्या पासून कोंबिग ऑपरेशन दरम्यान दबा धरून बसले होते. पहाटे ६:१५ वा. च्या दरम्यान पोलीस पथक चोरट्यांचा शोध घेत असताना केज-बीड महामार्गावर सावंतवाडी पाटीजवळ असलेल्या टोल नाक्यावर तीन इसम संशयित रित्या आढळून आले. पोलिसांना पहाताच ते तीन इसम पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलीस पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग केला. त्यात महादेव कल्याण पवार , सुंदर चंदर पवार या दोघांना ताब्यात घेतले तर बबन कल्याण पवार हा पळून गेला.
पोलीस नाईक दिलीप गित्ते यांच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. १२६/२०२२ भा. दं. वि. ४०१ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.
मार लागू नये रबर गुंडाळून करायचे चोरी!
चोरी करून चालत्या वाहनातून उतरताना मार लागू नये म्हणून चार ते पाच पॅन्ट आणि त्याच्या मागील बाजूस टायरचे रबर गुंडाळून चोरी करायचे आणि ताडपत्री फाडण्यासाठीची धारदार कत्ती हे साहित्यपोलिसांनी ताब्यात घेतले.