आपला जिल्हा

केज मतदारसंघातील काही गावांसाठी कोट्यवधी अन् येथे फ्यूज तारेची मारामार हा विरोधाभास का?

लोकगर्जनान्यूज

केज : तीन दिवसांपूर्वी केज मतदारसंघातील काही ठिकाणी लिंक लाईन, ब्रेकर बसवण्याच्या ३ कोटींच्या कामांचा शुभारंभ झाला. महावितरण कंपनीने एवढा निधी दिला परंतु याच मतदारसंघातील आडस येथे मागील काही वर्षांपासून साधी फ्यूज तार नाही. त्यामुळे ॲल्युमिनियमच्या तारेवर काम भागविण्यात येत आहे. त्यामुळे सतत फ्यूज उडण्याचे प्रकार घडत आहेत. हा विरोधाभास पहाता आडसला महावितरण कंपनीने वाऱ्यावर सोडले की, आमदारांनी असा प्रश्न जनता विचारत आहे.

केज तालुक्यातील आडस येथे महावितरण कंपनीचे ३३/११ केव्ही उपकेंद्र असून, कनिष्ठ अभियंता कार्यालय आहे. येथून परिसरातील काही गावांना वीजपुरवठा करण्यात येतो. येथील महावितरण कंपनीची वसुली चांगली आहे. घरगुती मिटरची बाकी तर नाही म्हटलं तरी चालेल. पण मागील काही महिन्यांपासून येथील वीजपुरवठा पुर्णपणे ढेपाळला आहे. शेतीपंप चालू असताना तर आडस फिडर अख्खा दिवस बंद ठेवण्यात येत असे. दुसरी समस्या की, येथे सिंगल फेज योजना असल्याने भार वाढून सदरील रोहीत्र जळत असल्याने येथे पहाटे ५ ते सकाळी ८ पर्यंत भारनियमन सुरू आहे. या व्यतिरिक्तही वीजपुरवठा खंडित होतो. तसेच येथील फ्यूज जाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. या फ्यूज साठी वेगळी तार असते परंतु येथे ॲल्युमिनियमच्या तारेवर काम भागवितात. फ्यूज गेला की, तो दोन तास टाकण्यात येत नाही. याबाबत संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना विचारणा केली तर , साहित्य मिळत नसल्याचे समोर आले. येथे फ्यूज तारेची मारामार असताना याच महावितरण कंपनीने केज मतदारसंघातील पठाण मांडवा, डिघोळअंबा, चनई ते डोंगर पिंपळा, धावडी, होळ ते दिपेवडगाव, होळ , युसुफ वडगाव ते माळेगाव येथे वीज कंपनी अंतर्गत लिंक लाईन, ब्रेकर बसवणे कामांचा लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रम सोमवारी ( दि. २० ) पार पडले. ही सर्व कामे तब्बल तीन कोटींपेक्षा जास्त रकमेची आहेत. वीज कंपनीकडे पैसा नाही तर हा निधी कसा दिला? आहे तर मग आडस येथे फ्यूज तार का नाही? तसेच येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राची दुरुस्ती नाही. हा विरोधाभास का? आडस उपकेंद्राला महावितरण कंपनीने वाऱ्यावर सोडले आहे की, आमदारांनी असा प्रश्न जनता विचारत आहे. याचे उत्तर कोणी देईल का?
फ्यूज गेला की, टाकण्यासाठी लागतात दोन तास
येथील फ्यूज जाण्याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. फ्यूज गेला की, तो टाकण्यासाठी तब्बल एक ते दोन तास लागतात. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन केला तर कधी लागतं नाही. लागला फोनही घेतला जाईल याची शाश्वती नाही. एका कर्मचाऱ्याचा तर फोनच लागत नाही. त्यांची काय अडचण आहे याचा शोध वरिष्ठ अधिकारी घेतील का?
काही रोहित्र चार महिन्यांपासून जाळालेले
येथील सिंगल फेजचे काही रोहित्र जळून जवळपास चार महिने झाले आहेत. अद्याप सदरील ठिकाणी दुसरे रोहित्र बसविण्यात आले नाहीत. यामुळे वीज ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.
गावठाण फिडरच्या मागणीकडे दुर्लक्ष
आडस हे मोठे गाव असल्याने येथे सिंगल फेज रोहित्रांची क्षमता कमी पडत आहे. यामुळे ते वारंवार जळतात. यामुळे गाव अंधारात रहाते. ही समस्या दूर करण्यासाठी येथे गावठाण फिडर वेगळं करुन गावातील सिंगल फेज रोहित्र काढून त्याठिकाणी दुसरे थ्री फेज रोहित्र बसविण्यात यावेत अशी मागणी आहे.परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »