लोकगर्जनान्यूज
केज : येथील बसस्थानकात प्रवाशांचे दागिने, रोख रक्कम इतर मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. या चोरट्यांचा तपास लावण्यात अद्याप केज पोलीसांना यश आले नसल्याने प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागतो आहे. यामुळे केज पोलीसांनी बसस्थानक चोरट्यांना आंदन दिले काय? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
केज बसस्थानक आणि चोरी हे आता समिकरण बनले आहे. तालुक्यातील अनेक गावांच्या प्रवाशांना बाहेर जाण्यासाठी केज येथे येऊन बसने जावे लागते. यामुळे येथील बसस्थानक नेहमीच गजबजलेलं असतं. याच गर्दीचा फायदा घेऊन टपून बसलेले पाकीट मार , चोरटे हे महिलांच्या गळ्यातील, पर्स, पिशवीतील दागिने,रोख रक्कम, तसेच खीसे कापून लोकांचे पैसे, मोबाईल लंपास करत आहेत. या घटना सातत्याने घडत असल्याने येथे नागरिकांच्या मागणीनुसार पोलीस चौकी सुरू झाली. तरीही काहीच फरक नसून मागील पंधरा दिवसांपूर्वी महिलांचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याच अद्याप पोलीसांना तपास लावण्यात यश आले नाही तोपर्यंत सोमवार ( दि. २० ) दुपारी कळंब येथील महिलेच्या पर्समधील दागिने केज बसस्थानकातून चोरीला गेल्याची घटना घडल्याचे वृत्त आहे. सदरील दागिने तब्बल ५ लाखांचे होते असे सदरील वृत्तात म्हटले आहे.या चोरीच्या घटना पहाता एसटीने प्रवास करावा की, नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटना रोखण्यासाठी पोलीसांनी प्रयत्न करावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
केज येथील चोऱ्या म्हणजे ‘दिव्या खाली अंधार’!
केज येथील उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून आयपीएस ( IPS ) पंकज कुमावत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या अधिकाऱ्याची जिल्हाभरात दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांमध्ये कशी दहशत आहे हे सांगायची गरज नाही. अनेक ठिकाणी छापे टाकून त्यांनी दोन नंबरवाल्याना सळोकीपळो करुन सोडलं आहे. पण केज बसस्थानकातील चोरीच्या घटना रोखण्यात त्यांनाही यश आले नाही. सततच्या घटना पहाता चोरटे आम्हाला कोणाची भीती नाही. असा प्रकार दिसून येत असल्याने हा दिव्या खाली अंधार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
पोलीस गायब;चोरटे हजर
नागरिकांच्या मागणीनुसार पोलीस प्रशासनाने बसस्थानक परिसरात पोलीस चौकी सुरू केली. चौकी सुरू झाल्यानंतर येथे नियमित कर्मचारी उपस्थित रहात होते पण मागील काही दिवसांपासून चौकी बंद रहात असल्याने पोलीस गायब चोरटे हजर असे काहीसे केज बसस्थानकाचे चित्र दिसत आहे.