केज-धारुर रस्त्यावर हातपाय बांधलेल्या व बेशुद्ध अवस्थेत अडत व्यापारी आढळला;रोड रॉबरीची चर्चा!

लोकगर्जना न्यूज
धारुर येथील अडत व्यापारी हातपाय बांधलेल्या व बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याची घटना सोमवारी रात्री १ च्या सुमारास केज-धारुर रस्त्यावर घडली. व्यापाऱ्यास उपचारासाठी अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रोड रॉबरीतून घडल्याची चर्चा असून पोलीस तपासात नेमके कारण समजू शकेल.
सुत्रांच्या माहिती नुसार गायके मारुतीराव रा. धारुर असे अडत व्यापाऱ्याचे नाव आहे. ते सोमवारी ( दि. २५ ) काही खाजगी कामानिमित्ताने केज येथे गेले होते. रात्री उशिरा पर्यंत घरी पोचले नाही त्यामुळे पुर्ण कुटुंब काळजीत पडले होते. काळजीपोटी नातेवाईकांनी धारुर पोलीसांशी संपर्क साधून या बाबतीत माहिती दिली. यानंतर पोलीसांनी केज रस्त्यावर शोध सुरू केला.रात्री १ वाजण्याच्या सुमारास कासारी पाटीजवळ एक दुचाकी पडलेली आढळून आली. सदरील दुचाकी मारुती गायके यांचीच होती तर काही अंतरावर व्यापारी हातपाय बांधलेल्या व बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. अंगावर मारहाण व धारदार शस्त्राने वार केल्याचे दिसत होते. तातडीने पोलीसांनी धारुर येथे दवाखान्यात दाखल केले. येथे प्रथम उपचार करुन पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार नेमका काय? असा प्रश्न उपस्थित केला जात असून, रोड रॉबरीतून मारहाण झाल्याची चर्चा आहे. परंतु खात्रीशीर माहिती अद्याप मिळालेली नसून व्यापारी शुध्दीवर आल्यानंतर अथवा पोलीस तपासात यावरील पर्दा उठेल व या घटनेमागील सत्य समोर येईल.