केज तालुक्यात विद्यार्थीनीची आत्महत्या; अभ्यास करूनही लक्षात रहात नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
लोकगर्जनान्यूज
केज : केज तालुक्यातील इयत्ता १० वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थीनीने टोकाचे पाऊल उचलत स्वतःच्या रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ( दि. १६ ) रात्री उशिरा घडली आहे. अभ्यास करुनही लक्षात रहात नसल्याने पुढे काय होणार? या चिंतेतू विद्यार्थीनीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मयत प्रेरणा किसन डोंगरे रा. कोठी ( ता. केज ) ही विद्यार्थिनी इयत्ता १० वर्गात शिक्षण घेत आहे. १० परिक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून मार्च मध्ये परिक्षा आहेत. यामुळे सर्व विद्यार्थी नेटाने अभ्यासाला लागले आहेत. प्रेरणाही दररोज अभ्यास करत परिक्षेची तयारी करत होती परंतु केलेला अभ्यास लक्षात रहात नसल्याने ती चिंतेत होती. या चिंतेतून तीने सोमवारी ( दि. १६ ) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घरातील लोखंडी रॉडला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खबर प्रेरणाचे वडील किसन ज्ञानोबा डोंगरे यांनी पोलीसांना दिली. यावरून केज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस बाळराजे सोनवणे हे करत आहेत. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.