केज तालुक्यात मंदिरात झोपलेल्या प्रवाशांना मारहाण करुन लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील मांगवडगाव फाटा येथील मंदिरात झोपलेल्या प्रवाशांना मारहाण करुन लुटमार करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात बीड स्थानिक गुन्हे शाखेला ( LCB ) यश आले. याप्रकरणी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अक्कलकोट येथील काही भाविक क्रुझर या खाजगी गाडीने देवदर्शनासाठी आले. ते दिवसभर प्रवास करुन थकल्यामुळे ( दि. ६ ) ऑगस्ट मांगवडगाव फाटा ( ता. केज ) येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या महादेव मंदिरात झोपले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी या झोपलेल्या भाविकांना मारहाण केली. तसेच त्यांच्या जवळील रोख रक्कम, मोबाईल, स्वयंपाक करण्याचे साहित्य असा एकूण १७ हजारांचा ऐवज चोरुन नेला तसेच दगडाने त्यांच्या क्रुझरचे काच फोडून नुकसान केले. याप्रकरणी दिगांबर सारंगधर झाडेकर रा. अक्कलकोट यांच्या फिर्यादीवरून युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा युसुफ वडगाव पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा ( LCB ) तपास करत होते. तपास सुरू असतानाच स्था.गु. शा. ( LCB ) पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना या भाविकांना लुटणारा संशयित आरोपी वरपगाव ( ता. केज ) येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. माहिती मिळताच साबळे यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन वरपगावकडे धाव घेतली येथे संशयित आरोपी नवनाथ मधुकर काळे यास ताब्यात घेतले. त्याकडे या प्रकरणी चौकशी केली असता त्याने दोन साथीदारांसह मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरून इतर दोन आरोपी दिपक बजरंग काळे, सदाशिव बजरंग काळे दोघे रा. नाहोली ( ता. केज ) यांनाही ताब्यात घेतले. तीन्ही आरोपींना ताब्यात घेत चोरी गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा बीड ( LCB BEED ) यांनी केली.