केज तालुक्यात दोघा भावाविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
ज्वारीचे पीक काढण्यावरून बाप-लेकास दगडाने मारहाण

केज : ज्वारीच्या पीकाची परस्पर काढणी करीत असताना विरोध करणार्या बापलेकास दोघा भावांनी जातीवाचक शिवीगाळ करीत दगडाने मारहाण केल्याची घटना होळ (ता.केज) येथे घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलिसात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
होळ येथील दत्तात्रय राणोजीराव सरवदे (वय 71) यांनी 1999 साली बाळासाहेब रामकीशन घुगे यांच्याकडून सर्वे नं. 143 1/अ/1 मधील 53 आर जमीन खरेदी केली होती. त्या जमिनीबाबत मालकी हक्काचा दावा केज कोर्टात सुरू आहे. ती जमीन सरवदे हे वाहिती करीत असून ज्वारीचे पीक घेतले आहे. हे ज्वारीचे पीक काढणीस आल्याने 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता दत्तात्रय सरवदे व त्यांचा मुलगा प्रवीण हे शेतात गेले. त्यावेळी गावातील हनुमंत दिगांबर घुगे, मिरा हनुमंत घुगे, कविता लक्ष्मण घुगे हे ज्वारीचे पीक काढणी करीत असल्याचे पाहून त्यांनी माझे पीक का काढता अशी विचारणा केली. त्यावर हनुमंत हा हे माझे शेत आहे म्हणल्यावरून त्यांनी कोर्टाचा मनाई हुकूम आहे का असे म्हणताच त्याने जातीवाचक शिवीगाळ करीत प्रवीण सरवदे यांचे गचुरे धरून चापटाबुक्याने मारहाण केली. तर लक्ष्मण दिगांबर घुगे याने डोक्यात मारत असताना दत्तात्रय सरवदे यांनी हातमध्ये घातल्याने हाताला जखम झाली. तर बाकीची जमीन कशी करता, शेतात आलात तर तुमचा काटा काढू अशी धमकी ही दिली. अशी तक्रार दत्तात्रय सरवदे यांनी दिल्यावरून हनुमंत घुगे, लक्ष्मण घुगे या दोघा भावाविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे पुढील तपास करत आहेत.