केज तालुक्यात तीन ठिकाणी अवैध दारू अड्ड्यावर छापे; एपीआय विलास हजारे यांची कारवाई
केज : तालुक्यातील माळेवाडी व दैठणा येथे तीन ठिकाणी अवैध दारू अड्ड्यावर छापे मारुन देशी-विदेशी दारु जप्त करुन पाच जणांवर केज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. दोन आरोपी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक यांचे जनसंपर्क अधिकारी एपीआय विलास हजारे यांनी शनिवारी ( दि. ६ ) सायंकाळी साडेपाच ते आठ वाजण्याच्या दरम्यान केली.
पोलीस अधिक्षक यांच्या आदेशावरून जनसंपर्क अधिकारी एपीआय विलास हजारे यांनी केज पोलीस ठाणे हद्दीतील दैठणा, माळेवाडी येथे अवैध दारू विक्री सुरू असलेल्या तीन ठिकाणी छापे मारले. यामध्ये येथे देशी-विदेशी दारुचा साठा मिळून आला. एकूण ३७ हजार ९०५ रू. मुद्देमाल जप्त केला. यामध्ये वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, विजय नरहरी काथमांडे रा. दैठणा, विकास नारायण जाधवर रा.माळेवाडी, उमेश नारायण जाधवर रा. माळेवाडी, कल्याण गुलाब गिरी, विष्णू मारुती शिंदे असे संशयित आरोपींची नावे आहेत. यातील दोघांना घटनास्थळी ताब्यात घेतले आहे. सदरील कारवाई एपीआय विलास हजारे, पोलीस कॉन्स्टेबल वनवे,राख, गायकवाड, काकडे, चव्हाण, कडु यांनी केली आहे.