केज तालुक्यात खळबळ! पत्नीने भावाच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढला
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथे शनिवारी सायंकाळी संशयास्पद अवस्थेत गावातील तरुणाचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी रविवारी ( दि. ४ ) मयताच्या आईच्या तक्रारीवरून पत्नी व मेव्हण्याच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दारु पिऊन दररोज त्रास देत असल्याने पत्नीने भावाच्या मदतीने नवऱ्याचा काटा काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
विकास शिवाजी भोसले ( वय ४० वर्ष ) रा. आडस ( ता. केज ) असे मयताचे नाव आहे. मयत हा आडसकर यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होता. शनिवारी ( दि. ३ ) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मानेवाडी रस्त्यावर बडगळा शिवारात शेततळ्यात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. विकास भोसले यास दारुचे वेसन होते. तो दररोज दारु पिऊन घरी येऊन पत्नी सोबत नेहमी भांडण व मारहाण करत असे, शुक्रवारी ( दि. २ ) मी नातवांना भेटण्यासाठी गेले असता तेव्हाही विकास हा दारु पिऊन आला असल्याने त्याचा मेव्हणा सिध्देश्वर अशोक खडके हा त्याला मारहाण करत होता. त्यांची सोडवा सोडव केली. यावेळी मेव्हण्याने दारु पिऊन माझ्या बहिणीला त्रास दिला तर तुला खल्लास करेल अशी धमकी दिली. याच रात्री ८ वाजण्याच्या सुमारास पत्नी व मेव्हण्याने शेतात सोडून येतो म्हणून माझ्या मुलाला दुचाकीवर घेऊन गेले. शनिवारी ( दि. ३ ) सायंकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. दारुच्या व्यसनाला व भांडणाला कंटाळून पत्नी व मेव्हण्याने खून केल्याची तक्रार मयताची आई द्रौपदी शिवाजी भोसले यांनी फिर्याद म्हटले आहे. तसेच रात्री उशिर झाल्याने सदरील मृतदेहाचे रविवारी ( दि. ४ ) अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात शवविच्छेदन झाले. यामध्ये गळा आवळल्याने विकासचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांनी सांगितले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या फिर्यादीवरून धारुर पोलीस ठाण्यात आरोपी सिद्देश्वर अशोक खडके ( मेव्हणा ), नंदिनी विकास भोसले ( पत्नी ) या दोघां विरोधात गु.र.नं. १७३ / २३ कलम ३०२, ५०६,३४ भाव.द.वी. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष भालेराव करत आहेत. याप्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.