केज तालुक्यात खळबळ! चुलत्या-पुतण्यात शेतीच्या वादातून हाणामारी; एक ठार
लोकगर्जना न्यूज
केज तालुक्यातील आडस येथे शेतीच्या वादातून चुलता-पुतण्यात तुंबळ हाणामारी झाली. या प्रकरणी धारुर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल आहेत. यातील जखमी चुलत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ही बातमी समजताच खळबळ माजली आहे.
आडस येथील गायके परिवारात मागील काही दिवसांपासून शेती व झाडावरुन वाद सुरू आहे. या वादातून चुलते-पुतण्यात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये एकमेकांना दगड व लाकडाने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी मला जमीन का देत नाही म्हणून पुतण्या संदीप यांने मारहाण केली. यावेळी माझा भाऊ अंकुश नामदेव गायके हा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्याच्याही डोक्यात लाकडी फळी मारुन जखमी केले. अशी फिर्याद विजय नामदेव गायके यांनी दिली. त्यावरून आरोपी संदीप प्रभाकर गायके याच्या विरुद्ध ( दि. २६ ) शनिवारी धारुर पोलीस ठाण्यात कलम ३२६, ३२३,५०४,५०६ भादवी नुसार गुन्हा दाखल आहे. तसेच पुतण्या संदीप प्रभाकर गायके याच्या फिर्यादीवरून विजय नामदेव गायके, अंकुश नामदेव गायके, नामदेव गायके, दयानंद गायके या चौघांवर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. असे चुलता-पुतण्या च्या फिर्यादीवरून परस्पर विरोधी गुन्हे दाखल आहेत. यातील अंकुश नामदेव गायके यांना डोक्याला जबर मार लागल्याने उपचारासाठी अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर येथून लातूर येथे हलविण्यात आले होते. लातूर येथे उपचारा दरम्यान अंकुश गायके यांचा मृत्यू झाला. ही वार्ता आडस येथे समजताच एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी आता शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच ३०२ कलमाची वाढ होईल आरोपी संदीप गायकेच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल होईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. आरोपी संदीप गायके यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.