केज तालुक्यात आजही गारपीट: फळबाग सह भाजीपाल्याचे नुकसान

केज : तालुक्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, काही ठिकाणी पावसाची भुरभुर आली परंतु माळेगाव ( ता.केज ) येथे दुपारी जोरदार पाऊस व गारपीट झाले. गारपीटीने फळबाग व भाजीपाल्याचे मोठं नुकसान झालं आहे.
मागील मार्च महिन्यात बीड जिल्ह्यासह केज तालुक्याला अवकाळी पाऊस व गारपीटीने झोडपून काढले आहे. यानंतर पुन्हा अवकाळीचे ढग आले. वेध शाळे कडून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा अंदाज व्यक्त केला. अंदाजानुसार आज शनिवार ( दि. ८ ) सकाळपासून ढगाळ वातावरण असून, बीड, गेवराई, वडवणी आदि भागात दुपारपर्यंत पाऊस झाला. केज तालुक्यातील माळेगाव, बोरगाव परिसरात दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान तासभर वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस व मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. तसेच देवगाव येथे वीज कोसळून बैल दगावल्याचे वृत्त आहे. गारांचा आकारही बोरा पेक्षा जास्त मोठा असल्याचे सांगितले जात असून, मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने गारांचा खच पडला होता. या गारपीटीने टरबुज, खरबूज, अंबे आदि फळबागांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. यासह आदि पिकांचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा अवकाळी संकट कोसळल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. गारपीटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना आधार द्यावा अशी मागणी केली जात आहे.