केज तालुक्यातील लक्ष लागले या गावच्या निवडणूकीकडे; पाच पॅनल आणि ती अपक्षांत होतेय सरपंच पदासाठी लढत
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका सुरू असून, यासाठी १८ डिसेंबरला मतदान आहे. या रणधुमाळीत कळमआंबा निवडणूकीने तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे. येथे पाच पॅनल आणि तीन अपक्ष उमेदवार अशी सरपंच पदासाठी लढत होत आहे. तब्बल पाच पॅनल अन् तीन अपक्ष उमेदवार असल्याने सरपंच कोण होणार? याचा अंदाज येत नाही. तीन प्रस्थापितांचे पॅनल असून, दोन पॅनल युवकांचे आहेत. या युवकांच्या पॅनलची प्रस्थापितांनी धास्ती घेतल्याची चर्चा आहे.
सध्या बीड जिल्ह्यात ७०४ व केज तालुक्यात ६६ ग्रामपंचायत निवडणूकांचे रणधुमाळी जोरदारपणे सुरू आहे. गावागावात पार्ट्या सुरू आहेत. रात्री बेरात्री कधीही घराची कडी वाजवून मतदारांचे पाया पडून आशिर्वाद मागितला जात आहे. फेसबुक, व्हॉट्स ॲप वर आमचाचं सरपंच या पोस्टचा महापूर आला. थेट जनतेतून सरपंच निवड होत असल्याने लढत चुरशीच्या ठरत आहेत. यावेळी दुरंगी लढत आता मागे बहुरंगी निवडणूक होत असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश ठिकाणी यावेळी तिरंगी लढत होत आहे. पण केज तालुक्यातील कळमआंबा-मानेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये तर कधी नव्हे ती ५ पॅनल उतरले आहेत. तसेच सरपंच पदासाठी तीन उमेदवार अपक्ष आहेत.२६०० मतदार असून ११ सदस्य व एक सरपंच निवडून द्यावयाचा आहे. यासाठी आडसकर, मुंदडा, सोनवणे या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या समर्थकांचे तीन पॅनल आहेत. या व्यतिरिक्त युवकांचे दोन पॅनल आहेत. यातील एका पॅनलमध्ये काही सदस्य कमी आहेत. सरपंच पदासाठी तीनजण अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. येथील निवडणूक चुरशीची होत असून, गुंतागुंतीची ठरणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. युवकांच्या पॅनलची चांगलीच चर्चा रंगली आहे. यामुळे प्रस्थापितांच्या पॅनलने धास्ती घेतल्याचे सांगितले जात आहे. तब्बल पाच पॅनल आणि तीन अपक्ष अशी बहुरंगी निवडणूक होत असल्याने अवघ्या तालुक्याचे लक्ष कळमआंबा निवडणूकीकडे लागले आहे.