केज तालुक्यातील धक्कादायक घटना!अल्पवयीन मुलाने उचललं टोकाचं पाऊल
केज : उसने पैसे देण्यास नकार देताच पारा चढलेल्या दोघांनी एका अल्पवयीन मुलास मारहाण करुन घरातील व्यक्ती बाबतीत अपशब्द वापरले. ते अपशब्द जिव्हारी लागल्याने मुलाने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील बनकरंजा येथे घडली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
विक्रम वसंत लांब (वय १७ वर्ष ) रा. बनकरंजा ता.केज हा वडील शेतात गेल्यामुळे कुंबेफळ शिवारातील हॉटेल सांभाळत होता. त्यावेळी बनकरंजा येथील कापले वस्ती येथे राहत असलेले बळीराम नानासाहेब लांब व सुभाष नवनाव लांब हे दोघे हॉटेलवर आले. त्यांनी विक्रमकडे २ हजार रुपये उसने देण्याची मागणी केली. जवळ पैसे नसल्याचे सांगत पैसे देण्यास नकार दिला. पैसे दिले नाहीत म्हणून चिडलेल्या बळीराम नानासाहेब लांब, सुभाष नवनाव लांब या दोघांनी कुटुंबातील व्यक्ती बद्दल अपशब्द वापरले. तसेच चापटा, बुक्क्यांनी मारहाण केली. वडील वसंत लांब हे शेतातून आल्या नंतर विक्रमने रडत रडत त्यांना घडलेली घटना सांगितली. वडिलांनी त्याला समजावून शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या दोघांनी वापरलेले अपशब्द जिव्हारी लागल्याने विक्रम अस्वस्थ होता. रात्री ९ च्या सुमारास त्याने बाथरुममध्ये खिडकीला शर्टाच्या साह्याने गळफास घेतला. गळफास घेतल्याचे दृष्टीस पडताच फास सोडवून त्यास उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले परंतु त्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या प्रकरणी मयत विक्रम लांब यांच्या वडिलांनी (दि. १३ ) दिलेल्या फिर्यादीवरून युसूफवडगाव पोलीस ठाण्यात बळीराम नानासाहेब लांब, सुभाष नवनाव लांब दोघे रा. बनकरंजा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.