केज तालुक्यातील थरार! पतीवर पिस्तूल लावून पत्नीला जाळण्याचा प्रयत्न मुलाच्या चेहऱ्यावर रसायन टाकलं?
न्यायासाठी जखमींनी गाठलं पोलीस अधीक्षक कार्यालय
लोकगर्जनान्यूज
केज : येथे थरारक घटना घडली असून शेतीच्या वादातून काहींनी पतीवर गजाने हल्ला करुन कानफटीवर पिस्तूल लावलं तर पत्नीला जाळण्याचा प्रयत्न केला. सदरील प्रकार शनिवारी ( दि. ११ ) घडला आहे. तर १० तारखेला मुलाच्या चेहऱ्यावर कोणतेतरी रसायन टाकून विद्रुप केला. या बाबतीत केज पोलीस ठाण्यात गेले असता हाकलून दिल्याने त्यांनी सरळ पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी केली.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, कासारी बोडखा येथील हे जखमी कुटुंब असून त्यांचा व भावकीतील लोकांशी जमिनीचा वाद अंबाजोगाई येथे कोर्टात सुरू आहे. जखमी रामहरी महादेव वायबसे ( वय ५१ वर्ष ), सखुबाई रामहरी वायबसे ( वय ४५ ) हे दोघे पती-पत्नी वकिलास भेटण्यासाठी शनिवारी ( दि. ११ ) केज येथे आले होते. यावेळी त्यांच्यावर हल्ला करून रक्तबंबाळ केलं तर पिस्तूल ही लावल्याचा आरोप केला. यावेळी पत्नीच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या एक दिवस आधी म्हणजे ( दि. १० ) मुलगा राहुल रामहरी वायबसे ( वय २६ वर्ष ) यांच्याही चेहऱ्यावर कोणतेतरी रसायन टाकून चेहरा विद्रूप केला. या तिघांनी काल ( दि. १२ ) पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून हल्लेखोरांवर कारवाईची मागणी केली. यावेळी ते जखमी असल्याने पोलीस उपअधीक्षक संतोष वाळके यांनी त्यांना प्रथम उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. रात्री जबाब घेण्यात येणार होते. तसेच या जखमींनी केज पोलीस ठाण्यातून हाकलुन दिल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.