केज तालुक्यातील थरार! पती-पत्नीवर अज्ञातांचा सशस्त्र हल्ला;पती ठार तर पत्नी जखमी

लोकगर्जना न्यूज
केज : अज्ञातांनी महिलेच्या गळ्यातील दागिने ओढून नेहण्याचा प्रयत्न केला. त्यांचा विरोध करण्यासाठी पतीही धावत आला. आरडाओरडा केली, यावेळी अज्ञातांनी धारदार शस्त्राने पती-पत्नीवर हल्ला केला. यामध्ये पतीचा मृत्यू झाला तर पत्नीवर उपचार सुरू आहेत. ही थरारक घटना सोमवारी सायंकाळी ७:३० ते ८ वाजण्याच्या सुमारास चिंचोली माळी ( ता. केज ) येथे घडली आहे. या घटनेने केज तालुक्यात खळबळ माजली आहे.
पांडुरंग नामदेव राऊत ( वय ५५ वर्ष ) रा. चिंचोली माळी असे मयताचे नाव आहे. ते पत्नीसह वरपगाव रस्त्यालगत रहातात. सोमवारी ( दि. ११ ) सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी घरात घुसून पांडुरंग यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून नेहण्याचा प्रयत्न केला. यावेळी पांडुरंग राऊत यांनी मदतीसाठी आरडाओरडा करत विरोध केला. यावेळी अज्ञातांनी राऊत पती-पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. यामध्ये दोघेही पती-पत्नी गंभीर जखमी झाले. आरडाओरडा ऐकून काही लोक पळत आले तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले तर पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्यांनी तातडीने दोघांनाही उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, केज दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून पांडुरंग राऊत यांना मृत घोषित केले. त्यांच्या पत्नीवर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली आहे. साडेसात -आठ वाजताच ही थरारक घटना घडल्याने खळबळ माजली आहे. तर हा प्रकार नेमका काय? याचा उलगडा पोलीस तपासात होईल.