केज तालुक्यातील तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात केले विष प्राशन
लोकगर्जना न्यूज
बीड : एका तरुणाने गावातीलच काही जणांच्या त्रासाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना आज सोमवारी ( दि. ४ ) बीड येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घडली. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या तरुणाला एका रिक्षाने जिल्हा रुग्णालयात पाठविले. सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
समाधान शिवाजी धिवार ( वय २५ वर्ष ) रा. मस्साजोग ( ता. केज ) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याने गावातील काही व्यक्ती त्रास देत असल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विषारी द्रव्य प्राशन केले. त्यास काही कर्मचारी व पोलीसांनी रोखण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांने तोपर्यंत विष प्राशन केले. यानंतर तो जमिनीवर लोळत होता. तेव्हा जिल्हाधिकारी तेथे आले. त्यांनी स्वतः पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने एका रिक्षात बसवून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिले. सदरील तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अचानक ही घटना घडल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात काहीवेळा धावपळ उडाली.