केज तालुक्यातील घटना ! शेतीच्या वादातू बापाच्या डोक्यात ठोंब्या… गुन्ह्याच्या पोलीस तपासात आला वेगळाच प्रकार समोर
दारुड्या बापाचा प्रताप! स्वतः च डोकं फोडून घेत मुलाने ठोंब्याने मारल्याचा केला बनाव

केज : चार दिवसांपूर्वी जमीनीच्या वादातून मुलाने बापाच्या डोक्यात ठोंब्या मारुन जखमी केल्याचा गुन्हा केज पोलीस ठाण्यात दाखल झाला. याचा तपास करताना दारुड्या बापाचेच अनेक कारनामे समोर आले असून त्याचा एक व्हिडिओ ही पोलीसांच्या हाती लागला आहे. तसेच तो तक्रार ही बनावट असून दारुच्या नशेत तांब्या डोक्यात मारुन घेत स्वतःच डोके फोडून घेतल्याच उघड झालं आहे.
संतोष नेमट रा. चिंचोली माळी ( ता. केज ) यास दारू पिण्याचे व्यसन असून, तो नेहमीच दारु पिऊन गोंधळ घालून कुटुंबाला त्रास देतो. दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही तर पत्नी, मुलगी, मुलाला मारहाण करतो. गुरुवारी ( दि. २१ ) एप्रिल संतोष दारु पिऊन घरी आला व पत्नी शोभा नेमटे यांना आणखी दारु पिण्यासाठी पैसे मागू लागला. शोभा यांनी पैसे नाही म्हणताच संतोषचा पारा चढला गोंधळ घालण्यास केली. पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मुलगी आईला वाचविण्यासाठी आली असता मुलीलाही मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच स्वतःच्या अंगावरचे कपडे काढून तो अर्धनग्न झाला. अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला परंतु तो कोणाचेही ऐकुन घेत नव्हता. यावेळी त्याने दारुच्या नशेत पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतले, पाणी पिण्याचा तांब्याने स्वतःच्या डोक्यात मारुन घेत हाताने डोकं फोडून घेतलं. यानंतर स्वतःच केज येथे जाऊन जमीन नावावर का करुन देत नाही म्हणून मुलगा शुभम नेमटे याने डोक्यात लोखंडी ठोंब्या मारल्याची तक्रार केली. त्यावरून पोलीसांनी मुला विरुद्ध गुन्हा दाखल केला. परंतु तपासात ही तक्रारच खोटी असल्याचे उघडकीस आले. तक्रारदार बाप दारुड्या असून, तोच पुर्ण कुटुंबाला त्रास देत असल्याचे समोर आले. दारु पिऊन तो कसा गोंधळ घालून मारहाण करतो याचा व्हिडीओ पोलीसांच्या हाती लागला आहे. पत्नी शोभा नेमटे यांच्या तक्रारीवरून आता दारुड्या संतोष नेमटेवरच गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक अशोक गवळी करत आहेत.