केज तालुक्यातील खळबळजनक घटना; शेजाऱ्यांनी मदत केल्याने मोठा अनर्थ टळला
पेट्रोल टाकून घर जाळण्याचा प्रयत्न; अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल
लोकगर्जनान्यूज
केज : अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून घर व आतील कुटुंबाला जाळण्याचा प्रयत्न ( दि. ७ ) मध्यरात्री अडीचच्या सुमारास ढाकेफळ ( ता. केज ) येथून घटना उघडकीस आली. शेजाऱ्यांनी लेकरांची आरडाओरडा ऐकून मदत केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही घटना उघडकीस येताच केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, ढाकेफळ ( ता. केज ) येथील गोविंद दिलीप थोरात, वैजनाथ व्यंकटी थोरात हे दोघे चुलत भाऊ गावातील हनुमान मंदिर जवळ आपल्या कुटुंबासह रहातात. सोमवारी रात्री ते नेहमी प्रमाणे घरात झोपलेले असताना मध्यरात्री अडीचच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या घरात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. पेट्रोलमुळे घरात आगीचा डोंब उसळला होता. यावेळी लहान लेकरं उठल्याने त्यांना आग दिसतात ते मोठ्यान रडू लागले यानंतर घरातील सर्वांनाच जाग आल्याने आगीचा डोंब पाहून आरडाओरडा सुरू झाली. ही आरडाओरडा ऐकून शेजारी धावत आले. आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तर वैजनाथ थोरात यांनी पत्रे कापून सर्वांना बाहेर काढून स्वतःही बाहेर पडले. यामुळे मोठा अनर्थ टळला. यामध्ये वैजनाथ थोरात गंभीर जखमी झाले असून गोविंद थोरात व त्यांची पत्नी आगीची झळ लागून भाजल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीसात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना समजताच केज तालुक्यात खळबळ उडाली असून हा प्रकार नेमका काय? हे घर जाळून नुकसान करण्याचा प्रयत्न होता की, आतील सहा जणांना जाळण्याचा हे पोलीस तपासात निष्पन्न होईल.