केज तालुक्यातील ऊसतोड कुटुंबावर काळाची झडप, दुर्दैवी घटनेत मुलगा ठार तर आई-वडील गंभीर जखमी
आज पहाटे उस्मानाबाद जिल्ह्यात अपघात
लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील कोल्हेवाडी येथील ऊसतोड मजूर कुटुंब येडशी ( जि. उस्मानाबाद ) येथील कारखान्यावर ऊसतोडणी साठी गेले आहे. आज बुधवारी ( दि. १६ ) पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर-आयशर टेम्पोची धडक होऊन घडलेल्या अपघातात एकजण ठार तर आई-वडील गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.घटना समजताच नातेवाईकांनी येडशीकडे धाव घेतली असून कोल्हेवाडी वर दुःखाचं डोंगर कोसळा आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथील मिसाळ कुटुंब उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी येथील साखर कारखान्यावर ऊसतोडणी साठी गेले आहे. स्वतःचे ट्रॅक्टर असल्याने आई-वडील,मुलगा तिघेही लेबर म्हणून काम करतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या कुटुंबाने मेहनत करुन ट्रॅक्टर घेतलं आहे. तिघेही पहाटे ट्रॅक्टर मध्ये जाताना पाठीमागून आलेल्या आयशर टेम्पोने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यामुळे ट्रॅक्टर रस्त्याखाली गेले. चालक असलेला ज्योतीराम सुनील मिसाळ ( वय २४ वर्ष ) रा. कोल्हेवाडी ( ता. केज ) हे टायरखाली आल्याने जागीच ठार झाले. तर वडील सुनील ज्ञानोबा मिसाळ ( वय ४५ वर्ष ), आई सत्वशाला सुनील मिसाळ ( वय ४० वर्ष), रा. कोल्हेवाडी ( ता. केज ) हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.