केज तालुक्यातील आडस, चंदन सावरगाव, कुंबेफळ येथे आंदोलन

लोकगर्जनान्यूज
केज : तालुक्यातील आडस येथे लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ तसेच वीज व २५ टक्के अग्रीमच्या मागणीसाठी तसेच चंदन सावरगाव येथे दुष्काळ, वीज तर कुंबेफळ येथे वीज प्रश्नी शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
चंदन सावरगाव
शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गतवर्षीचे अनुदान वाटप, केज तालुक्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा, शेती पंपाची लोडशेडींगचं बंद करुन योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यात यावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी केज-अंबाजोगाई रस्त्यावर चंदन सावरगाव येथे भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आला. यावेळी परिसरातील अनेक गावचे शेतकरी उपस्थित होते.
आडस
*लाठीचार्ज निषेधार्थ अन् अग्रीम, विद्युत प्रश्नी आडस येथे बंद, रस्ता रोको
केज तालुक्यातील आडस येथे जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षण आंदोलकांवरील लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ तसेच २५ टक्के अग्रीम व विद्युत प्रश्नी बंद , रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रमुख मान्यवरांनी सरकारवर सडकून टीका केली.
अंतरवली सराटी ( ता. अंबड जि. जालना ) येथे मराठा आरक्षण मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी लाठीचार्ज झाला. याचे पडसाद राज्यभर उमटले असून या घटनेचा निषेध करण्यासाठी आडस येथे रविवारी ( दि. ३ ) सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच शासनाच्या निषेधार्थ दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळीच सर्व गावकऱ्यांनी गावातून निषेध रॅली काढली. नंतर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन १० वाजता रस्ता रोको आंदोलन सुरू केले. यावेळी प्रस्ताविक रामदास साबळे यांनी केले तर श्रमिक संघाचे संस्थापक लक्ष्मण वाघमारे, राम माने, वैजनाथ वाघमारे यांनी मनोगत व्यक्त करत सरकारवर सडकून टीका केली.संचालन शिवरुद्र आकुसकर यांनी केले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन महसूल, महावितरण, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
चौकट —————————–
लक्ष्मण वाघमारे यांचा आत्मदहनाचा इशारा!
आंदोलनस्थळी आपले मनोगत व्यक्त करताना श्रमिक संघाचे संस्थापक लक्ष्मण वाघमारे यांनी सरकारने मराठा बांधवांचा अंत न पहाता दोन महिन्यांत मराठा आरक्षणाची घोषणा करावी. अन्यथा मी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला.
कुंबेफळ
अतिरीक्त विजभार जोडण्यात येऊ नये व 5MVA ची क्षमता वाढवण्यासाठी शेतकरी आक्रमक ….
आज दिनांक २ सप्टेंबर २०२३ रोजी केज तालुक्यातील कुबेंफळ सबस्टेशन वर अतिरीक्त जोडलेली गावे काल महावितरणने त्यांच्या कक्षेनुसार कट केली होती ती परत जोडण्यासाठी राजकीय दबाव येत असल्याने अभियंता यांच्याकडुनही कर्मचारी यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता.जर या सबस्टेशनला तोडलेला अतिरीक्त भार परत जोडला तर इथल्या शेतकऱ्यांना सातत्याने अडचणीचा सामना करावा लागतो अन् यामुळेच मागच्या काळात विजे अभावी भाजीपाला पिकांचे,सोयाबीनचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.त्यामुळे मागच्या दोन महिन्यात कुबेंफळ व ढाकेफळ प्रत्येकी एक एक शेतकऱ्याने आत्महत्या केली होती.किमान या घटनेनंतर तरी महावितरणने व प्रशासनाने सतर्क होणे गरजेचे होते पण तसे झाले तर नाहीच त्याउलट शेतकऱ्यांना जास्तीचे वेठीस धरण्याचे काम प्रशासन करत आहे.
सदरील अतिरीक्त भार जोडण्यात येऊ नये व कुबेंफळ सबस्टेशनवर 5MVA ची क्षमता तात्काळ वाढवावी तसेच सध्या पावसाअभावी दोन महिने झाले पीके पार करपुन गेलीत,हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातोय.तसेच काल जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या पोलीसांनी लाठीचार्ज केला त्याचा शेतकऱ्यांच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला. यावेळी कुबेंफळ,ढाकेफळ,जानेगाव,सारणी,बनकरंजा येथील सरपंच,उपसरपंच व शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने विजेच्या अड आंदोलनास उपस्थित होते.