केज जवळ ‘जॅक’ टाकून लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; बीड एलसीबीची धडाकेबाज कारवाई
सामान्य जनतेतून बीड पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षाव

लोकगर्जना न्यूज
मांजरसंबा-केज-अंबाजोगाई रस्त्यावर जॅक टाकून वाहनधारकांना आमिष दाखवून वाहन थांबले की, त्यांना मारहाण करुन लुटल्याच्या केज जवळ दोन घटना घडल्या आहेत. यामुळे रात्री या मार्गाने प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परंतु बीड एलसीबीने या टोळीचा पर्दाफाश केला असून, आज पहाटे जॅक टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बीड येथून अंबाजोगाई कडे जात असलेल्या कार चालकाला सोने सांगवी ( ता. केज ) जवळ रस्त्यावर जॅक पडलेला दिसला तो घेण्यासाठी कार थांबवून खाली उतरताच अंधारात दबा धरून बसलेल्या सहा ते सात जणांच्या टोळक्याने हल्ला केला. कार चालकासह कार मधील इतर व्यक्तींना जबर मारहाण करुन त्यांच्याकडील रोख रक्कम, दागिने इतर काही मौल्यवान वस्तू जबरदस्तीने काढून घेऊन पसार झाले. ही घटना (दि. ७ ) मे पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ताजी असतानाच पुन्हा याच रस्त्यावर मस्साजोग ( ता. केज ) शिवारात कदमवाडी पाटीजवळ रस्त्यावर जॅक टाकून ( दि. २३ ) मे रात्री १:३० वाजण्याच्या सुमारास जॅक घेण्यासाठी थांबलेल्या ट्रक जालक व अन्य एकास मारहाण करून त्यांच्याकडून दोन मोबाईल व रोख रक्कम काढून घेतली. या प्रकरणी केज पोलीसात गुन्हा दाखल आहे. या वाढत्या घटना पहाता प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. याप्रकरणी बीड एलसीबी या टोळीच्या मागावर होती. दरम्यान गुप्त खबऱ्याने जॅक रस्त्यावर टाकून लुटणाऱ्या टोळीची पुर्ण खात्रीशीर माहिती दिली. एलसीबी पथकाने मोठ्या शिताफीने आरोपी सचिन शिवाजी काळे ( वय 24 वर्षे ) रा . पारा ता.वाशी, पापा ऊर्फ काळ्या ऊर्फ आकाश बापु शिंदे ( वय 22 वर्षे ) रा . खोमनवाडी शिवार ता . केज, रामा लाला शिंदे ( वय 23 वर्ष ) रा . नांदुरघाट , दादा सरदार शिंदे ( वय 45 वर्ष ) रा . नांदुरघाट, विकास ऊर्फ बाबा ज्ञानोबा पवार ( वय 22 वर्ष ) रा . चिंचोली माळी गायराण ता . केज यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता. त्यांनी वरील दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली. या आरोपींना केज पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. या आरोपींकडून गुन्ह्यात चोरलेला मोबाईल जप्त करण्यात आला. या टोळीवर चोरी , जबरी चोरी , दरोडा , घरफोडी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे बीड तसेच उस्मानाबाद जिल्हयात दाखल आहेत. सध्या यांची कसून चौकशी सुरू असून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सदरील कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली बीड एलसीबीने केली आहे. या कारवाईमुळे रात्री प्रवास करणाऱ्या वाहन धारकांचा जीव भांड्यात पडला आहे. पोलीसांच्या या कामगिचे कौतुक करण्यात येत आहे.