केज कृषी कार्यालये कर्मचारी दांडी यात्रेवर: तहसील कडून पंचनामा
कृषी मंत्र्यांकडे तक्रार करणार- महेश जगताप

लोकगर्जना न्यूज
केज येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सतत कर्मचारी दांडी यात्रेवर असल्याच्या तक्रारी वाढल्या असून, पावसाळा तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना आता विविध योजनांची माहिती मिळत नाही. आज शुक्रवारी कर्मचारी गैर हजर असल्याची तक्रार तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली. तक्रारीची दखल घेऊन तहसीलदार यांनी कृषी कार्यालयाचा पंचनामा करण्याचे आदेश दिले. पंचनाम्यात सहा पैकी एक कर्मचारी कार्यालयात आढळून आला. या प्रकरणी राष्ट्रीय जनकल्याण संस्थेचे महेश जगताप यांनी कृषी मंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
पावसाळा तोंडावर असल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी जमवाजमव सुरू आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कृषी अधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत. परंतु कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड होतो. येथील कार्यालयात शासनाने सहा कर्मचारी नेमलेले आहेत. काही शेतकरी कृषी कार्यालयात आले असता एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. हे नेहमीचे चित्र पाहून संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदार दुलाजी मेंडके यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेऊन तहसीलदार यांनी मंडळ अधिकारी भागवत पवार यांना कृषी कार्यालयाचा स्पॉट पंचनामा करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार मंडळ अधिकारी पवार यांनी पंचनामा केला असता सहा पैकी फक्त एक कर्मचारी सेवेवर आढळून आला. तसा अहवाल त्यांनी सादर केला. तहसीलदार हे अहवाल वरिष्ठांना पाठविणार आहेत. त्यामुळे आता या दांडी भादर कर्मचाऱ्यांवर काय? कारवाई होणार? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
सहा कर्मचारी नेमलेले असताना एकही कर्मचारी उपस्थित रहात नसल्याने चार-चार दिवस चकरा मारुन शेतकऱ्यांना कोणतीही माहिती मिळत नाही. त्यामुळे येथील कृषी कार्यालयाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. त्यामुळे या दांडी भादर कर्मचाऱ्यांची तक्रार कृषी मंत्र्यांकडे करणार असल्याचे महेश जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.