केज कृषी उत्पन्न बाजार समिती मतदारांच्या अपहरणाचा गंभीर आरोप; जिल्हा प्रशासनाकडे तक्रार

लोकगर्जनान्यूज
केज : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीची रणधुमाळी सुरू असून, भाजपा, राष्ट्रवादी व शिवसेना असा तिरंगी सामना रंगला आहे. भाजपा व राष्ट्रवादीकडून मतदारांचे अपहरण केले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली.
केज कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडीसाठी येत्या 28 तारखेला मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी पक्षासह राज्यात मित्र असलेल्या शिंदे गट शिवसेनेने भाजपा विरोधात निवडणूकीच्या मैदानात उडी घेतली आहे. जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली केज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 14 जागेवर उमेदवार उभे करुन विरोधकांसमोर तगडे आव्हान निर्माण केले. प्रथमच तिरंगी लढत होत असल्याने नेमकं काय होणार? याचा अंदाज येत नसल्याचे चित्र आहे. म्हत्वाची व शेतकऱ्यांशी संबंधित संस्था असल्याने सर्वांनीच आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. याच दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी भाजपा व राष्ट्रवादी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उमेदवारांचे अपहरण करत असल्याचा व विविध आमीष दाखविण्यात येत असल्याचा गंभीर आरोप केला. याप्रकरणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली. तसेच येथील निवडणूक निर्भय वातावरणात पार पडेल की, नाही असा संशय व्यक्त केला. त्यामुळे जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार? याकडे केज तालुक्याचे लक्ष लागले आहे.