केज अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना एचपीएम कंपनीकडून १६ लाखांची आर्थिक मदत!

लोकगर्जना न्यूज
केज येथील भवानी चौकात रविवारी ( दि. ८ ) दुपारी ४ च्या सुमारास ट्रक, ट्रॅक्टर, बुलेट व एक कार असे चार वाहनांच्या विचित्र अपघाताची घटना घडली. यामध्ये बुलेट वरील तरूण ट्रकखाली दबून ठार झाले. या अपघातानंतर संथ गतीने रस्त्याचे काम करणाऱ्या एचपीएम कंपनीवर रोष व्यक्त करण्यात आला. तसेच त्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावं म्हणून जमावाने ठिय्या आंदोलन केले. या एचपीएम कंपनीने प्रत्येकी ८ लाख असे दोघा मृतांच्या कुटुंबीयांना १६ लाखांची आर्थिक मदत केली. ही माहिती भ्रष्टाचार निर्मूलनचे सादेख इनामदार यांनी दिली.
अंबाजोगाई-केज-मांजरसुंबा या राष्ट्रीय महामार्गाचे मागील दोन वर्षांपासून एचपीएम कंपनी संथ गतीने काम सुरू आहे. केज शहरातील जाणारा रस्ताही खोदून ठेवलेला असून, भवानी चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक दोन्ही चौकातील काम पुर्ण झालेलं नाही. त्यामुळे येथे अपघाताच्या घटना घडत आहेत. रविवारी ( दि. ८ ) दुपारी ४ वाजता ऊस घेऊन धारुर कडून आलेल्या भरधाव ट्रकने अंबाजोगाईच्या दिशेने चाललेल्या ट्रॅक्टरला धडक दिली. नंतर तो पलटी होऊन बुलेटवर कोसळला. बुलेट ट्रकच्या खाली आल्याने त्यावरील शेख जुबेर, कुरेशी शहेबाज हे दोघं जागीच ठार झाले. यानंतर संतप्त जमावाने मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवून एचपीएम कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावं म्हणून ठिय्या आंदोलन केले. जमावाची भावना ऐकून एएसपी पंकज कुमावत यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यानंतर जमाव शांत झाला व आंदोलन मागे घेण्यात आले. सोमवारी ( दि. ९ ) एचपीएम कंपनीनेही घटनेचं गांभीर्य ओळखून दोन्ही मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली. प्रत्येकी ८ लाख असे १६ लाख रुपये दिले जाणार आहेत. सोमवारच्या तारखेत कुटुंबियांच्या नावे धनादेश ( चेक ) तयार झाले आहेत. ते बाय पोस्ट कुटुंबियांच्या नावे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती सादेख इनामदार यांनी दिली आहे. यासाठी केज, धारुर येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांची मोठी मेहनत घेतली असल्याने हे शक्य झाल्याचे सांगितले.