केज-अंबाजोगाई महामार्गावर होळ जवळ चार चाकीचा अपघात; ५ जण जखमी
लोकगर्जना न्यूज
केज : लातूर येथून बोलेरो जीपमध्ये नगर येथे नीटच्या परिक्षेसाठी जाताना अंबाजोगाई -केज महामार्गावर होळ जवळ जीप पलटी होऊन रस्त्याच्या खाली पडून झालेल्या अपघातात ५ जण जखमी झाल्याची घटना आज शुक्रवारी ( दि. १५ ) घडली आहे. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून अंबाजोगाई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी हे पाथर्डी येथील आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील सिरसाट कुटुंबातील मुलं लातूर येथे क्लासेस लावून नीटची तयारी करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. अहमदनगर येथे नीटचा पेपर असल्याने पालक बोलेरो जीप घेऊन मुलांना परिक्षेला घेऊन जाण्यासाठी आले होते. लातूर येथून मुलांना घेऊन नगरकडे जाताना केज तालुक्यातील होळ थोडं पुढे जाताच बोलेरो चा अपघात झाला. यामध्ये सौरभ सिरसाट, सुजित सिरसाट, सुरेश सिरसाट, विनोद सिरसाट अन्य एक असे पाच जण जखमी झाले आहेत. अपघात घडताच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन केला. रुग्णवाहिका येताच उपस्थितांनी मदत करत जखमींना अपघातग्रस्त जीपच्या बाहेर काढून रुग्णवाहिकेत बसवून उपचारासाठी अंबाजोगाई येथे स्वाराती रुग्णालयात पाठवून दिले. अपघात कसा घडला हे समजु शकले नाही. परंतु जीप रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झालेल्या अवस्थेत आहे.