केजमध्ये भीषण आग;पाच दुकाने जळून खाक लाखोंचे नुकसान
केज : येथे रात्री भीषण आगीची घटना घडली असून यामध्ये महामार्गालगत असलेली पाच दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामध्ये लाखोंचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मंगळवार पेठ कॉर्नर जवळील महामार्गालगत असलेल्या दुकानास मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास आग लागली. रात्रीची वेळ असल्याने कोणाच्या निदर्शनास न आल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. यामध्ये वामनराव जोगदंड यांचे भारत इलेक्ट्रीकल्स, बबन धस यांचे उत्तम उपहारगृह, महेश चौरे यांचे कृष्णा ॲटो गॅरेज, गंपतराव गवळी यांचे सोनाली ऑफसेट, राम शिंदे यांचे गोविंद जेन्टस पार्लर ही पाच दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामध्ये मोठ आर्थिक नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊन, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान पहाता ग्राहक नसल्याने बाजारपेठेत शुकशुकाट आहे. त्यातही आगीची घटना घडली. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.