केजमध्ये तीन वाहनांचा विचित्र अपघात;दोघे ठार

केज : येथील भवानी चौकात ट्रक, ट्रॅक्टर व बुलेट या तीन वाहनांचा विचित्र तिहेरी अपघात घडला. यामध्ये बुलेट वरील दोघेही जागीच ठार झाले. या अपघाताला एचपीएम कंपनीचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऊस वाहतूक करणारा ट्रक हा धारुर कडून भरधाव वेगाने आला. तो सरळ ट्रॅक्टरवर आदळून नंतर बुलेटला धडक देऊन पलटी झाला असल्याचे सांगितले आहे. बुलेट वरील दोघेही तरुण ट्रकखाली दबले.ट्रक खाली अडकलेल्या तरुणांना काढण्यासाठी तातडीने क्रेन मागविण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजुला सारुन तरुणांना काढण्यात आले. तोपर्यंत ते दबून जागीच ठार झाले. दोघेही केज शहरातील रहिवासी असून शेख जुबेर आसेफ, कुरेशी शहेबाज नसीर अशी नावं असल्याची प्राथमिक माहिती आहे. अंबाजोगाई-केज-मांजरसुंबा या राष्ट्रीय महामार्गाचे काम एचपीएम कंपनी धिम्या गतीने करत असल्याने अर्धवट कामामुळे हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे.