केजमध्ये तहसीलदार, पोलीस अधिकारी, मुख्याधिकारी रस्त्यावर उतरले विनामास्क फिरणाऱ्या विरुद्ध कारवाई
केज : येथे महसूल, पोलीस आणि नगर पंचायत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संयुक्तरित्या विनामास्क पादचारी, वाहन चालक यांच्यावर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. यासाठी स्वतः तहसीलदार दुलाजी मेंडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, नायब तहसीलदार सचिन देशपांडे नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अशोक साबळे रस्त्यावर उतरले आहेत.
राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले असून तिसरी लाट आल्याचं सांगितलं जातं आहे. याला रोखण्यासाठी शासनाकडून निर्बंध कडक करण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू करण्यात आली. परंतु नागरिक अद्यापही गंभीर दिसत नाहीत. त्यामुळे लोकांनी खबरदारी घ्यावी म्हणून आज ( दि. ११ ) केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक समोर विनामस्क फिरणारे पादचारी आणि वाहनचालक यांच्यावर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली. स्वतः अधिकारीच रस्त्यावर उतरल्याने या कारवाईच्या भीतीने का होईना मास्क लावणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसून आले.